महाराष्ट्राचा १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के, कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.८१ टक्के निकाल !
मुंबई – महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. ३ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.८१ टक्के इतका निकाल लागला. यावर्षी कोरोनामुळे १२ वीची परीक्षा रहित करण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण मंडळाने निश्चित केलेल्या निकषावरून १२ वीचा निकाल घोषित करण्यात आला.
या परीक्षेसाठी १३ लाख १९ सहस्र ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यांतील १३ लाख १४ सहस्र ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागाचा निकाल ९९.७५ टक्के, नागपूर ९९.६२, मुंबई ९९.७९, कोल्हापूर ९९.६७, अमरावती ९९.३७, नाशिक ९९.६१, लातूर ९९.६५, तर संभाजीनगर विभागाचा निकाल ९९.३४ टक्के इतका लागला. एकूण निकालामध्ये विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.७३, तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.५४ टक्के इतके आहे.
काय होता निकष ?
इयत्ता १० वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ३० टक्के, ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ३० टक्के, तर १२ वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आदी अंतर्गत परीक्षांच्या मूल्यमापनावरून ४० टक्के गुण या निकषावरून १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत.