आनंदी, हसतमुख आणि दायित्व घेऊन संतसेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील कु. विशाखा चौधरी !

आषाढ कृष्ण पक्ष एकादशी (४.८.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. विशाखा चौधरी यांचा वाढदिवस आहे. कु. विशाखा सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई (वय ८० वर्षे) आणि सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई (वय ७४ वर्षे) यांची सेवा करतात. पू. देसाईआजी-आजोबा यांचा मुलगा श्री. अनिल सीताराम देसाई यांना जाणवलेली कु. विशाखा यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. विशाखा चौधरी

 कु. विशाखा चौधरी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. समाधानी वृत्ती

‘प्रारंभी कु. विशाखा हिच्याकडे काही मोजक्याच वस्तू होत्या. तेव्हा ‘एखादी गोष्ट आपल्याकडे हवीच किंवा इतरांसारखे मलाही मिळावे’, असे तिच्या बोलण्यातून कधी जाणवले नाही.

२. अल्पावधीतच जवळीक साधणे

अ. दोन वर्षांपूर्वी पू. आई (पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई) घरात पडल्याने त्यांच्या कमरेला दुखापत झाली होती. त्यांना चालता येत नव्हते. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितली होती. त्यामुळे पू. आई आणि पू. बाबा (पू. सीताराम देसाई) रामनाथी आश्रमात रहायला आले. त्या वेळी विशाखा पू. आई आणि पू. बाबा यांच्या सेवेत मला साहाय्य करण्यासाठी येऊ लागली. तेव्हा ती आश्रमात नवीनच होती, तरीही तिने अल्पावधीतच आमच्या कुटुंबियांशी जवळीक साधली आणि आता ती आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याप्रमाणे पू. आई अन् पू. बाबा यांची सेवा करते.

आ. पू. आई आणि पू. बाबा आश्रमात येण्यापूर्वी गावी रहात होते. त्यामुळे त्यांना आश्रमजीवनाची सवय नव्हती. प्रारंभी त्यांना आश्रमात रहाणे थोडे अवघड वाटत होते; पण विशाखाने वयाने लहान असूनही पू. आई आणि पू. बाबा यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे त्यांना हळूहळू आश्रमजीवनाची सवय झाली आणि आता ते आश्रमात चांगले रुळले आहेत.

३. दायित्व घेऊन संतसेवा करणे

अ. मी आणि विशाखा दोघे जण पू. आई आणि पू. बाबा यांच्या सेवेत असतो; परंतु ‘त्या दोघांची सेवा करणे’, हे स्वतःचेच दायित्व आहे’, या भावाने कु. विशाखा सेवा करत असते. माझ्याकडून एखादी सेवा करायची राहिली, तर ती माझी वाट न बघता ती सेवा करण्याचा प्रयत्न करते.

आ. पू. आई किंवा पू. बाबा यांना काही त्रास होत असेल, तर ती लगेच त्यांची विचारपूस करते आणि त्यांना काही अडचण असल्यास ती सोडवण्याचा प्रयत्न करते.

इ. कु. विशाखा रुग्णाईत असल्यामुळे काही दिवस पू. आई आणि पू. बाबा यांच्या सेवेला आली नव्हती. एकदा  तिने पू. बाबांच्या खोकण्याचा आवाज ऐकला. त्या वेळी तिने त्वरित साधकांचे साहाय्य घेऊन वैद्यांशी संपर्क साधला आणि पू. बाबांना औषधे उपलब्ध करून दिली.

४. कु. विशाखा करत असलेल्या सेवेचे पू. देसाईआजी-आजोबा यांच्या नातेवाइकांनी कौतुक करणे

पू. आई आणि पू. बाबा आश्रमात रहायला आल्यानंतर आमचे काही नातेवाईक त्यांना भेटायला यायचे. त्या वेळी त्यांना पू. आई आणि पू. बाबा यांची सेवा करण्यास माझ्या समवेत विशाखा असल्याचे समजले. ‘ती वयाने लहान असूनही आनंदाने सेवा करते’, हे पाहून आमच्या नातेवाइकांनाही आनंद झाला. त्यांनाही तिचे कौतुक वाटते. त्यांनी मला भ्रमणभाष केल्यावर ते विशाखाचीही विचारपूस करतात.

५. हसतमुख आणि आनंदी

विशाखा सतत हसतमुख आणि आनंदी असते. तिच्या आनंदी स्वभावामुळे खोलीतील वातावरणही आनंदी असते. ती प्रत्येक गोष्ट सहजपणे करते. त्यामुळे मला ताण येत नाही.

६. विशाखामध्ये जाणवलेले पालट

अ. मागील २ वर्षांत तिची सेवा करण्याची क्षमता आणि गती वाढली आहे.

आ. ती नवीन नवीन गोष्टी शिकून घेते आणि संतसेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

इ. ती प्रत्येक कृती आध्यात्मिक स्तरावर करण्याचा आणि सेवाभाव वाढवण्याचा प्रयत्न करते.

‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘विशाखामध्ये असलेले गुण माझ्यातही येऊ देत आणि माझ्याकडूनही पू. आई अन् पू. बाबा यांची सेवा भावपूर्ण होऊ दे’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. अनिल देसाई, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.   (३१.७.२०२१)


प्रेमळ आणि संतांप्रती भाव असणारी आध्यात्मिक सखी कु. विशाखा चौधरी !

कु. विशाखा चौधरी यांच्या सहसाधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. गुलाबी धुरी

१. प्रेमभाव 

अ. ‘विशाखाला तिच्या आईने घरून काही खाऊ पाठवल्यास ती मला बोलावून तो खाऊ द्यायची. पू. देसाईआजी-आजोबांनी तिला दिलेला खाऊ ती माझ्यासाठी राखून ठेवत असे.

आ. मी घरी गेल्यानंतर विशाखा स्वतःहून २ – ३ दिवसांनी मला भ्रमणभाष करून माझी विचारपूस करायची.

२. सेवाभाव

२ अ. सेवा मनापासून करणे : विशाखा पू. देसाईआजी-आजोबांची सेवा करते. तिला ‘त्यांच्या खोलीतील केर काढणे, लादी पुसणे, पूजा करणे, पू. आजींना मर्दन करणे, त्यांचे कपडे धुणे’, अशा अनेक सेवा दिवसभरात करायच्या असतात. त्या वेळी तिला दुसरी सेवा सांगितल्यानंतरही ती दिलेली सेवा मनापासून पूर्ण करते.

२ आ. साधकांनी सांगितलेली सेवा पूर्ण करून त्यांचा विश्वास संपादन करणे : विशाखाला एखादी सेवा दिल्यानंतर ती सेवा पूर्ण करून सेवेचा आढावा देते. त्यामुळे ‘विशाखाला सेवा सांगितल्यानंतर ती सेवा पूर्ण होणार’, हा विश्वास तिने साधकांमध्ये निर्माण केला आहे.

३. आध्यात्मिक सखी

अ. मला आणि विशाखाला संतसेवा मिळाल्यापासून ती माझी आध्यात्मिक सखी झाली. माझ्याकडून संतसेवेत होणार्‍या चुका मी तिला सांगायचे. तेव्हा मला कधी कधी निराशाही यायची. त्या वेळी विशाखा मला प्रेमाने समजवायची. ती मला सांगायची, ‘‘या चुकीतून आपण दोघीही शिकूया आणि प्रयत्न करूया.’’ त्यामुळे मला तिचा आधार वाटायचा.

आ. संतसेवा करतांना आम्ही दोघी आम्हाला सुचलेले भाववृद्धीचे प्रयोग एकमेकींना सांगायचो. त्यामुळे आम्हा दोघींनाही सेवेतून आनंद मिळत असे.

‘विशाखाला नेहमीच आनंदी राहून साधना करता येऊ दे’, हीच गुरुचरणी प्रार्थना ! ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विशाखासारखी गोड, निरागस, आनंदी आणि भरभरून प्रेम करणारी आध्यात्मिक सखी दिली’, यासाठी मी त्यांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहे.’

– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२१)