स्थानांतरासाठी आरोग्य कर्मचार्यांकडून राजकीय नेत्यांच्या शिफारसींची पत्रे !
स्थानांतरांसाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांसह गुजरात राज्यातील मंत्र्यांकडूनही शिफारस !
घरगुती कारणास्तव ‘विनंती स्थानांतर’ हे योग्य; मात्र स्वतःच्या आवडीनुसार आणि अधिक काम असल्याच्या कारणावरून कामचुकार कर्मचारी स्थानांतरांसाठी राजकीय नेत्यांच्या शिफारसींची पत्रे घेतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी नियमाप्रमाणेच आणि दुजाभाव न करता कर्मचार्यांचे स्थानांतर करणे आवश्यक आहे. – संपादक
नागपूर – सरकार शासकीय कर्मचार्यांच्या स्थानांतरामध्ये पारदर्शकता असल्याचा दावा करते; मात्र आरोग्य खात्यातील ‘वर्ग तीन’मधील कर्मचार्यांच्या स्थानांतरांसाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारसींची पुष्कळ पत्रे पाठवण्यात आली आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ६ जून २०२१ या दिवशी आरोग्य संचालकांना लिहिलेले एक पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्यात १०१ पैकी ६३ कर्मचार्यांनी स्थानांतरासाठी मंत्री, खासदार आणि आमदार यांसह काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचीही पत्रे शिफारस म्हणून जोडली आहेत. इतर सूचीतही शिफारसींचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. केवळ ३८ जणांनी कुणाचीही शिफारस पत्रे जोडलेली नाहीत.
कोरोनामुळे यंदा सरकारने अल्प प्रमाणात कर्मचार्यांचे स्थानांतर करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आरोग्य विभागातील ‘विनंती स्थानांतर’ १६ ऑगस्टपर्यंत होणार आहे. पती-पत्नी एकत्रिकरण, आजारपण आणि इतर वास्तविक कारण असल्यास ‘विनंती स्थानांतरा’नुसार अर्ज करता येतो. या स्थानांतरासाठी आरोग्य खात्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींना साकडे घालत आहेत.
कर्मचार्यांसाठी शिफारस करणार्यांमध्ये मंत्री धनंजय मुंडे, अमित देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, बाळासाहेब पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे, दिलीप वळसे पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख, नितीन राऊत या राज्यातील मंत्र्यांसह गुजरातचे मंत्री ईश्वर पटेल यांचाही समावेश आहे.
‘‘सार्वजनिक आरोग्य विभागात यंदा १६ ऑगस्टपर्यंतच ‘विनंती स्थानांतर’ होणार आहे. त्यासाठी अर्ज करणार्या ‘वर्ग ३’ आणि इतरही श्रेणीतील कर्मचार्यांमध्ये लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे जोडलेल्यांचे प्रमाण अधिक आहे; परंतु त्यात काही गैर नसून शेवटी प्रत्येकाचे कुणाशी नातेसंबंध अथवा मैत्री असू शकते; पण विभागाकडून पती-पत्नी एकत्रिकरण, आजारासह इतर निवडक कारणे पाहूनच ‘विनंती स्थानांतर’ केले जाते.’’ – डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग. |