शंभर वर्षांपूर्वीचे लोकमान्य टिळकांचे पत्र चिपळूण येथील महापुरात वाहून गेले ! – प्रकाश देशपांडे, कार्यवाह, लोटिस्मा
चिपळूण – लोकमान्य टिळकांच्या ‘होमरूल’ चळवळीसाठी येथील चिदानंद तपस्वी यांनी ५ रुपयांची देणगी (शंभर वर्षापूर्वी पाच रुपयाला मोठी किंमत होती.) पाठवली होती. देणगी मिळाल्यानंतर टिळकांनी तपस्वी यांना आभाराचे पत्र पाठवले. ते पत्र येथे आलेल्या २२ जुलैच्या महापुरात वाहून गेले आहे. शंभर वर्षांचा हा मौल्यवान ठेवा वाहून गेल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मारक (लोटिस्मा) वाचन मंदिराचे कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी दिली.
या पत्राला १२ फेब्रुवारी २०२१ या दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली होती. येथील कै. विलास गोगटे यांचे चिदानंद तपस्वी हे आजोबा होत. त्यांच्याकडे मिळालेले हे पत्र ‘लोटिस्मा’च्या वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आले होते. याविषयी श्री. प्रकाश देशपांडे म्हणाले, ‘‘शंभर वर्षांपूर्वी चिपळुणातील चिदानंद तपस्वी (गोगटे) हे भिक्षेतून मिळणार्या पैशातून सामाजिक कार्य करायचे. ते लोकमान्य टिळकांना खूप मानायचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा आणि लोकमान्यांच्या राष्ट्रीय कार्यात जितके साहाय्य करता येईल, तेवढी करायची हा त्यांचा बाणा होता. इंग्रजांच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ चालू केली. या चळवळीसाठी फंड आणि इतर यंत्रणा उभी करणे चालू झाले. त्या वेळी चिदानंद तपस्वी यांनी भिक्षेतून मिळणारे ५ रुपये लोकमान्य टिळकांच्या होमरूल फंडासाठी पाठवले होते. त्यामुळे तपस्वी यांची देणगी मिळाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांना १३ फेब्रुवारी १९२० या दिवशी पत्र लिहिले. देणगी दिल्याविषयी तपस्वींचे आभार मानतांना टिळकांनी पत्रात लिहिले होते की, आपल्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आमच्या कार्याला यश येईल, हे सांगायला नको. ईश्वर यश देईल.
आपण रोजच्या निर्वाहाच्या भिक्षेतून काढून ५ रुपयाचा प्रसाद पाठवलात. तो होमरूल लीगकडे जमा केला आहे. या देणगीची किंमत रुपयांच्या संख्येवर नाही. ही ज्या रितीने, हेतूने आणि धार्मिक बुद्धीने गोळा झालेली आहे, त्याची किंमत अनमोल आहे, याची जाणीव आहे. यामुळे या देणगीचा स्वराज्य-संघाच्या वतीने मी मोठ्या आनंदाने, अभिमानाने आणि भक्तीने स्वीकार करतो. आपले आशीर्वाद केळकर, खाडिलकर आणि इतरांना कळवले आहेत. चिपळूणला येऊन श्री परशुरामाच्या दर्शनाचा योग घडावा, अशी इच्छा आहे, असे टिळकांनी त्या पत्रात लिहिले होते.’’