पुणे जिल्ह्यात ७ मासांमध्ये १ लाख ५५ सहस्र फेरफार नोंदींचे काम पूर्ण !
पुणे, ३ ऑगस्ट – कोरोनाच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे मार्चपासून फेरफार नोंदी, वारस नोंद, सातबारा उतारे, आठ-अ (हे भूमीशी संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे) या संबंधित नोंदी प्रलंबित होत्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आलेल्या ‘फेरफार अदालती’मध्ये एका दिवसात ३ सहस्र २६९ नोंदी निकालात काढण्यात आल्या. फेरफार निकाली काढण्यासाठी मासातून २ वेळा ‘फेरफार अदालत’ घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केल्या आहेत. जानेवारी ते जुलै या कालावधीत १ लाख ५५ सहस्र ४३३ फेरफार नोंदी नव्याने घेण्यात आल्या असून त्यातील १ लाख ५५ सहस्र ४२२ नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वारसा नोंदीच्या कामासमवेत सातबारा संगणकीकरणाच्या कामात पुणे जिल्हा प्रगतीपथावर आहे. ऑगस्टअखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सातबारा उतारे, आठ-अ, फेरफार उतारे ऑनलाईन विक्री करण्यातून २ कोटी ५० लाख ८५ सहस्र २५५ रुपये एवढा महसूल जमा झाला आहे.