देशातील २४ विद्यापिठे बोगस घोषित

महाराष्ट्रातील एका विद्यापिठाचा समावेश

बोगस विद्यापिठे स्थापन होऊन चालू असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक

नवी देहली – विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य जनता आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे विद्यापीठ अनुदान आयोगाने (‘यु.जी.सी.’ने) देशातील २४ स्वयंघोषित विद्यापिठांना बोगस घोषित केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली. (तक्रारी आल्यावर नव्हे, तर स्वतःहून सतर्कतेने माहिती घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)

१. उत्तरप्रदेश राज्यात सर्वाधिक ८ बोगस विद्यापिठे आहेत. यामध्ये वाराणसीतील वाराणसी संस्कृत विद्यापीठ, प्रयागराजमधील महिला ग्राम विद्यापीठ, अलीगडमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, प्रतापगडमधील महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ, नोएडातील इंद्रप्रस्थ शिक्षण परिषद आदींचा समावेश आहे.

२. देहलीमध्ये ७, ओडिशा आणि बंगाल येथे प्रत्येकी २, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी येथे प्रत्येकी १ बोगस विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात नागपूरमधील सेंट जॉन्स विद्यापिठाचा यात समावेश आहे.