देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी मृत्यू झालेल्या कर्मचार्याला पाठवले पत्र !
शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा आरोप
देवगड – येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील आर्थिक घोटाळ्यात प्रथमदर्शनी सहभागी असणार्या; परंतु दीड वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचार्याला शिक्षण विभागाने चक्क चर्चेसाठी पत्र पाठवले आहे. यावरून शिक्षण विभागाच्या कारभाराची प्रचीती येते. ज्या विभागाला कर्मचार्याचा मृत्यू दीड वर्षापूर्वी झाला हे ठाऊक नाही, ते आर्थिक घोटाळ्याची चौकशी काय करणार ? असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘या घोटाळ्यात प्रथमदर्शनी सहभागी असलेल्या १६ कर्मचार्यांना ९ जुलैला गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षणाधिकार्यांच्या उपस्थितीत चर्चेसाठी येण्याविषयी पत्र पाठवण्यात आले होते. दीड वर्षापूवी मृत्यू झालेल्या एका कर्मचार्याच्या घरीही हे पत्र पाठवण्यात आले. या घोटाळ्यात शिक्षकांना नाहक गोवण्यात आले असून त्यांचीही चौकशी चालू आहे. घोटाळा झाला त्या कालावधीतील तत्कालीन अधिकारी आणि लेखा परीक्षक यांचीही चौकशी झाली पाहिजे.’’