सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची असुविधा
लसीकरणासाठी पहाटेपासून रांगा लावूनही लस मिळत नसल्याचा आरोप
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे; मात्र लसींचा अल्प साठा, नागरिकांना नावनोंदणी करण्यात येणार्या अडचणी, तसेच अन्य समस्या यांमुळे लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. (कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने लसीकरण चालू केले; मात्र योग्य नियोजनाच्या अभावी लसीकरण केंद्रावर गर्दी आणि गोंधळाची स्थिती निर्माण होत असेल, तर तेथे कोरोनाविषयीचे नियम कसे पाळले जातील ? त्यातूनच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला उत्तरादयी कोण ? – संपादक)
‘मालवण शहरातील मामा वरेरकर लसीकरण केंद्रावर अशीच गोंधळाची स्थिती आहे. येथे लसीकरणासाठी रात्रीपासून रांग लावून असणार्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून माघारी पाठवले जात आहे; मात्र याच वेळी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्या मर्जीतील व्यक्तींना लस दिली जाते. हा काय प्रकार आहे ? रांगेतील नागरिकांना लस मिळत नाही, तर या खास व्यक्तींसाठी लस येते कुठून ? या अनागोंदी कारभाराकडे सत्ताधारी राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल’, अशी चेतावणी मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी मालवण भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
वैभववाडी शहरातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी वयोवृद्ध, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राखीव कोटा ठेवावा, तसेच लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी येथील भाजपच्या पदाधिकार्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘वैभववाडी शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी मोठी गर्दी होते. पहाटेपासून नावनोंदणी करावी लागते. यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांची हेळसांड होत आहे. गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी येऊन बसण्यास सांगितले; मात्र वयोवृद्ध, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना पहाटेपासून येणे शक्य नाही’, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉ. पवार यांना सांगितले.
या वेळी माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य प्राची तावडे आदी उपस्थित होते.
जनतेची असुविधा टाळण्यासाठी लसीकरणाचे नियोजन करण्याची मागणी
नियोजनाच्या अभावी लसीकरण केंद्रावर वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. याचा त्रास जनतेसह आरोग्य कर्मचार्यांनाही सहन करावा लागत आहे. जनता तिचा रोष लोकप्रतिनिधींवर व्यक्त करत आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.