गोव्याची ‘वेश्याव्यवसाय असलेले ठिकाण’, अशी प्रतिमा निर्माण होत आहे ! – जुलीयन लोहारा, समन्वयक, ‘अन्याय रहित जिंदगी’
मडगाव, २ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात वेश्याव्यवसाय फोफावत आहे. देशभरात ‘वेश्याव्यवसाय असलेले ठिकाण’, अशी गोव्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे. पर्यटक आता समुद्रकिनार्यांचे सौदर्य पहाण्यासाठी नव्हे, तर वेश्यांकडे जाण्यासाठी गोव्यात येऊ लागले आहेत. वेश्याव्यवसाय आता केवळ हॉटेल किंवा ‘मसाज पार्लर’ यांच्यापुरता मर्यादिन नसून तो निवासी प्रकल्पांमध्येही फोफावत आहे. गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी याला विरोध केला पाहिजे, असे आवाहन ‘अन्याय रहित जिंदगी’ या वेश्याव्यवसायासाठी होणार्या महिलांच्या तस्करीच्या विरोधात कार्य करणार्या संघटनेच्या समन्वयक जुलीयन लोहारा यांनी केले. ‘रोटरी क्लब ऑफ मडगाव मिडटाऊन’ यांनी मानवी तस्करीच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने मडगाव येथील रवींद्र भवन येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जुलीयन लोहारा बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘वेश्याव्यवसायासाठी गोवा हे देशभरातील एक प्रमुख ठिकाण बनले आहे. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत देशभरातील २४ राज्यांमधून महिला आणि युवती यांची गोव्यात तस्करी करण्यात आली. गोव्यात मोठमोठ्या निवासी प्रकल्पांमध्ये आता वेश्याव्यवसाय फोफावत आहे. निवासी प्रकल्पांच्या सदनिकांमध्येही वेश्याव्यवसाय चालत आहे.’’ (ही परिस्थिती गोव्यासाठी लज्जास्पद ! – संपादक)