सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत ! – काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी
चित्रदुर्ग (कर्नाटक) – बलिष्ठ हिंदु राष्ट्र निर्माण झालेच पाहिजे. यासाठी प्रत्येक हिंदू एकजूट झाला पाहिजे; मात्र सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत. देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित सभेमध्ये दिली. या सभेला राष्ट्रीय दलित संघाचे ओबळेश उग्रनरसिंह, श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी, अखिल भारत हिंदू महासभेचे राज्य प्रभारी गंगाधर, वन्दे मातरम् राष्ट्रीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालतेश अरस, समस्त विश्व धर्मरक्षा सेनेचे संस्थापक योगी संजित सुवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.
ऋषीकुमार स्वामी म्हणाले की, राज्यात नित्य धर्मांतर घडत आहे. आधी केवळ दलितांनाच आकर्षून घेतले जात होते. आता धर्मांतराचा प्रयत्न करणारे सर्व जातींमध्ये पसरले आहे. असेच चालत राहिले, तर हिंदूंचे अस्तित्व नष्ट होऊन दुसर्या धर्मासमोर मान खाली घालावी लागेल. त्यामुळे हिंदू संघटनांना आता एकजूट व्हावे लागेल. हिंदु धर्मातील एकजुटीच्या अभावाचा लाभ अन्य धर्मीय करून घेत आहेत.
६४ हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ! – काळिका युवासेनेचे संस्थापक प्रमुख डी.एस्. सुरेशबाबु
काळिका युवासेनेचे संस्थापक प्रमुख डी.एस्. सुरेशबाबु म्हणाले की, ‘भारत हिंदु राष्ट्र झाला पाहिजे’ या संकल्पासह या महान कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अनेकांचा उद्देश एकच असूनही संघटना मात्र वेगवेगळ्या झाल्या आहेत. पहिल्या टप्प्याला राज्यांतील ६४ हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एका व्यासपिठावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.