ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्र.ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन !
पुणे, २ ऑगस्ट (वार्ता.) – येथील ‘महाराष्ट्र एज्युकेशन संस्थे’चे विद्यार्थी प्रिय शिक्षक, मुख्याध्यापक, उत्कृष्ट शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ‘सावरकर-एक चिकित्सक अभ्यास’ हा संशोधन प्रबंध पुणे विद्यापिठात प्रथम सादर करून विद्यावाचस्पती (पी.एच्.डी.) पदवी मिळविणारे, ज्ञानसाधक असलेले आणि शिक्षणक्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखन करणारे लेखक प्राचार्य डॉ. प्र.ल. गावडे (वय ९७ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने पुण्यात आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
‘सावरकर-एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर वर्ष १९६८ मध्ये त्यांनी पुणे विद्यापिठाची पी.एच्.डी. संपादन केली होती. त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापिठाकडून उत्कृष्ट प्रबंध म्हणून ‘न.चि. केळकर पारितोषिक’ आणि ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले होते. तसेच वर्ष १९७१-१९७२ मध्ये या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवायही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मराठी वाङ्मय हा त्यांचा अध्यापनाचा विषय होता. स्वा. सावरकर, स्वामी विवेकानंद तसेच ज्ञानेश्वरी या विषयावर ते अभ्यास करून चिंतन करत आणि या विषयावर व्याख्यानेही देत.