अजून किती व्यापार्यांची आत्महत्या होण्याची वाट सरकार पाहणार आहे ? – व्यापार्यांचा संतप्त सवाल
व्यापारी महासंघाचे पुण्यामध्ये ३ ऑगस्टला घंटानाद आंदोलन !
पुणे – व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे. राज्य सरकारने याची नोंद न घेतल्यास दुसर्या दिवशी सायंकाळी ७ पर्यंत दुकाने चालू ठेवणार असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार असून शनिवार आणि रविवारचे नियम पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे व्यापारीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. किती व्यापार्यांची आत्महत्या होण्याची वाट सरकार पहाणार आहे ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.