सातारा आगारात इंधनाचा तुटवडा !
सातारा, २ ऑगस्ट (वार्ता.) – दळणवळण बंदीमुळे अनेक मार्गांवरून बसेस मोकळ्याच धावत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही आगारांनी डिझेल मागवणेच बंद केले आहे. त्यामुळे त्या आगारांच्या बसेस डिझेल भरण्यासाठी सातारा आगारामध्ये येत आहेत. गत २ दिवसांपासून सातारा आगारातही इंधनाचा तुटवडा भासू लागला आहे. ३१ जुलै या दिवशी सातारा आगारात आलेला १२ सहस्र लिटरचा डिझेलचा टँकर अवघ्या ४ घंट्यांमध्ये संपला; परंतु याविषयी सातारा आगार प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती घोषित करण्यात आलेली नाही.