संभाजीनगर पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत हाणामारी !
भाजपचे उपसभापती अर्जुन शेळके यांना दालनात घुसून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप !
लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे लोकशाहीला अशोभनीय आहे. एकमेकांना मारहाण करणारे लोकप्रतिनिधी नकोत, तर जनतेच्या भल्यासाठी सामोपचाराने कार्य करणारे लोकप्रतिनिधी हवेत ! – संपादक
संभाजीनगर – येथील पंचायत समितीमध्ये १ ऑगस्ट या दिवशी काँग्रेस आणि भाजप सदस्यांत हाणामारी झाली. पंचायत समितीचे नवनिर्वाचित भाजपचे उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून त्यांनाही मारहाण करण्यात आली. काँग्रेसच्या सदस्यांनीच ही मारहाण केली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. शेळके यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत ते उपसभापती म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसने त्याचाच राग काढला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीला भेट दिली. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये कार्यालयात झालेली धुमश्चक्री आणि आसंदी भिरकावल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत.