प्रेमळ, सतत देवाच्या अनुसंधानात असणार्या आणि देवावरील श्रद्धेच्या बळावर अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करणार्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी
प्रेमळ, सतत देवाच्या अनुसंधानात असणार्या आणि देवावरील श्रद्धेच्या बळावर अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करणार्या सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी (वय ८५ वर्षे) !
श्री. वाल्मीक भुकन (नातू, मुलीचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रबळ इच्छाशक्ती आणि देवावरील श्रद्धा अन् भक्ती यांमुळे अर्धांगवायूसारख्या आजारातून बर्या होणार्या पू. लोखंडेआजी !
‘६.११.२०२० या दिवशी पू. लोखंडेआजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले आणि त्यांना त्यांचा डावा हात अन् पाय हालवता येत नव्हता. आधुनिक वैद्यांनी त्यांना नियमित मर्दन आणि काही व्यायाम करायला सांगितले होते. आम्ही त्यांच्याकडून नियमितपणे व्यायाम करवून घ्यायचो आणि त्यांना मर्दन करायचो. आम्ही त्यांना मर्दन करतांना आणि त्यांच्याकडून व्यायाम करवून घेतांना त्या आमचे निरीक्षण करायच्या अन् त्याप्रमाणे त्या दिवसभर स्वतः कृती करायच्या. आमच्या समवेत त्यांनीही प्रयत्न केल्यामुळे अल्प कालावधीत त्यांचा डावा हात आणि पाय यांची हालचाल चालू झाली. ‘आम्ही त्यांना मर्दन केल्यामुळे नव्हे, तर लवकर बरे होण्याच्या त्यांच्या तळमळीमुळेच त्या आज स्वतः काठी घेऊन चालू लागल्या आहेत’, असे मला वाटते, तसेच त्यांची देवावरची श्रद्धा आणि भक्ती यांमुळे देवाने त्यांना साहाय्य केले. ‘स्वतःचे प्रयत्न आणि देवाचे साहाय्य यांमुळे पू. आजींनी या वयात हे साध्य केले’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे’, असे मला वाटते.
२. पू. आजींनी आजारपणातही स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करणे
पू. आजींना स्वतःच्या कृती स्वतः करण्याची सवय आहे. त्यांच्या आजारपणात आम्ही कुटुंबीय त्यांची सेवा करतो. ‘आम्हाला त्यांचे सर्व करावे लागते’, याची त्यांना पुष्कळ खंत वाटते. त्यामुळे त्या स्वतः त्वरित बर्या होऊन स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये त्या कधीच साहाय्य मागत नाहीत.’ (१४.७.२०२१)
सौ. रोहिणी भुकन (नातसून (मुलीची सून)) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
‘घरी कुणी आले, तर पू. आजींची त्यांना काहीतरी खाऊ देण्याची इच्छा असते. त्यामुळे त्या स्वतःजवळ काहीतरी खाऊ ठेवतात आणि साधक किंवा अन्य कुणी आले, तर त्यांना तो देतात.
२. पू. आजी त्यांचे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवतात. त्यांचे किंवा आमचे कपडे उसवले किंवा फाटले असतील, तर त्या ते तत्परतेने हाताने शिवून ठेवतात.
३. सतत कार्यरत असणे
पू. आजी सतत काही ना काही काम किंवा सेवा करत असतात. त्यांना फुलझाडे लावण्याची पुष्कळ आवड आहे. ‘त्या रिकाम्या बसल्या आहेत’, असे होत नाही.
४. नातू आणि नातसून यांनी नमस्कार केल्यावर पू. आजींनी त्यांना लवकर आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आशीर्वाद देणे
आम्ही (मी आणि माझे यजमान) रामनाथी आश्रमात सेवेसाठी जातांना पू. आजींना नियमित नमस्कार करतो. तेव्हा पू. आजी आमच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतात, ‘‘लवकर लवकर प्रगती होऊ दे. तुमच्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे प्रयत्न होऊ देत.’’
५. सतत अनुसंधानात असणे
पू. आजींचा दिवस-रात्र नामजप अन् देवाशी अनुसंधान चालू असते. त्या सतत ‘कृष्णा, कृष्णा’ आणि ‘गुरुदेवा, गुरुदेवा’, असे म्हणत असतात. त्यांचे काही दुखत असेल, तर त्या म्हणतात, ‘‘हे परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही मला शक्ती द्या आणि बरे करा. मला तुमची सेवा करता येऊ दे.’’
६. पू. आजी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे आणि रामराज्य लवकर येऊ दे’, अशी प्रार्थना करतात.’
(१४.७.२०२१)