कळणे येथील खाण बंद ठेवण्यासह हानीभरपाई देण्याची आणि अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची राजकीय नेत्यांची मागणी !

कळणे खाण खनिज उत्खनन

सिंधुदुर्ग – कळणे येथील खाण दुर्घटनेनंतर प्रशासनाने खनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले असले, तरी मनसेने अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची, राष्ट्रवादी काँग्रेसने आपद्ग्रस्तांना हानीभरपाई देण्याची, तर दीपक केसरकर यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत खाण बंद ठेवण्याची मागणी केली आहे. खनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक थांबवण्याचे प्रशासनाचे आदेश

सावंतवाडी – कळणे खाण प्रकल्पाच्या ठिकाणी घडलेली घटना लक्षात घेता, त्या ठिकाणी होणारे खनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक तात्काळ थांबवण्यात यावी, असा आदेश संबधित आस्थापनाला दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही खाण बंद रहाणार आहे, असे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेरेखोल नदीतील गाळ काढण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. तशा सूचना संबधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत, असे प्रांताधिकारी खांडेकर यांनी सांगितले.

खाण उद्योगाचे समर्थक असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे स्थानांतर होण्यासाठी मनसे आंदोलन करणार

कणकवली – जिल्ह्यातील नागरिकांना खाण उद्योग नकोच आहे; परंतु सर्व राजकीय पुढार्‍यांचे खाण उद्योग (मायनिंग) हे उत्पन्नाचे साधन झाले आहे. त्यामुळे या उद्योगाला पाठीशी घालण्याचे काम या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. खाण उद्योगाच्या विरोधात मनसेने यापूर्वी आवाज उठवला होता; मात्र कोणत्याही प्रकारे याची नोंद घेतली गेली नाही. त्यामुळे खाण उद्योगाचे समर्थक असलेले ‘अप्पर जिल्हाधिकारी हटवा, पर्यावरण वाचवा’, यासाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून ‘अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे स्थानांतर करा’, अशी मागणी केली जाणार, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयातून आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर पुढे म्हणाले, ‘‘कणकवली तालुक्यातील कासार्डे, तसेच पियाळी या भागांतही अशाच प्रकारची अवस्था आहे. पियाळी येथील खाण उद्योगाला ८४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता; परंतु अद्याप त्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही. गौण खनिजाच्या अनुषंगाने अधिकार्‍यांकडे माहिती मागितली असता अधिकारी काहीही माहिती देत नाहीत. या खाण उद्योगाचे समर्थक असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांना का हटवले जात नाही ? सत्ताधार्‍यांचा यात सहभाग आहे का ? असे प्रश्न जनतेला पडले आहेत.

आपद्ग्रस्तांना हानीभरपाई न मिळाल्यास खाण प्रकल्पाचा एकही डंपर बाहेर पडू देणार नाही ! – पुंडलिक दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस  

सावंतवाडी – कळणे खाण प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलन होऊन शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. शेतकर्‍यांना तातडीने हानीभरपाई न मिळाल्यास प्रकल्पाचा एकही डंपर बाहेर पडू देणार नाही. शेतकर्‍यांना अधिकाधिक हानीभरपाई मिळावी, यासाठी स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेदेखील पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली.

… तोपर्यंत काम बंद ठेवा ! – आमदार दीपक केसरकर यांची सूचना

दोडामार्ग – कळणे खाण आस्थापनासह पोटमालकीने जे आस्थापन कळणे येथे खाण खोदत आहे, त्या आस्थापनावरही गुन्हा नोंद करा. जोपर्यंत या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत कळणे खाण आस्थापनाने येथे कोणत्याही प्रकारचे काम करू नये, अशी सक्त सूचना आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकार्‍यांना आणि दोडामार्गचे पोलीस निरीक्षक आर्.जी. नदाफ यांना केली.