गोव्यातील संचारबंदीत ९ ऑगस्टपर्यंत वाढ
पणजी, १ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीमध्ये ९ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या लागू असलेली संचारबंदी २ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होती.
राज्यातील संचारबंदीमध्ये वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३१ जुलै या दिवशी दिले होते. या वेळी ते म्हणाले होते, ‘‘या वेळी संचारबंदीत आणखी काही सवलती देता येत असल्यास पहाण्यात येईल आणि संबंधित अधिकारी याविषयी नंतर घोषणा करतील. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची टक्केवारी घटून ती १.९२ टक्क्यांवर आलेली आहे. मागील काही दिवसांत प्रतिदिन ९० ते १५० या संख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.’’ राज्यात ९ मेपासून संचारबंदी लागू आहे.