प्रेमळ, सेवेची तळमळ असणारा आणि इतरांना साहाय्य करणारा फोंडा (गोवा) येथील कु. वेदांत राहुल राऊत (वय १४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वेदांत राहुल राऊत एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
आषाढ कृष्ण पक्ष नवमी (२.८.२०२१) या दिवशी फोंडा (गोवा) येथील कु. वेदांत राहुल राऊत याचा चौदावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची काकू आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. वेदांत राहुल राऊत याला चौदाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
सौ. समृद्धी स्नेहल राऊत (काकू), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
अ. ‘मी आश्रमातून सेवा करून कधी विलंबाने घरी गेले, तर मी दमले असल्याचे कु. वेदांतच्या लक्षात येते. वेदांतचे काका घरी विलंबाने आले, तर तो त्यांची विचारपूस करतो. त्याच्या आजीचे पाय दुखत असल्यास तो मनापासून तिचे पाय दाबून देतो.
आ. एकदा मला पुष्कळ ताप आला होता. तेव्हा त्याने रात्री माझ्या कपाळावर मीठ-पाण्याच्या घड्या ठेवल्या. तो मधून मधून माझा ताप तपासत होता.
२. इतरांना साहाय्य करणे
आश्रमात कुणाला काही वस्तू उचलायला साहाय्य हवे असल्यास तो त्यांना तत्परतेने साहाय्य करतो.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
आम्ही दळणवळण बंदीच्या कालावधीत घरी होतो. तेव्हा तो प्रतिदिन नामजप करायचा आणि स्वतःकडून झालेल्या चुका लिहायचा. तो प्रतिदिन अग्निहोत्र करायचा.
४. सेवेची तळमळ
अ. एकदा मी वेदांतला म्हटले, ‘‘आपण एक दिवस स्वच्छतेसाठी घरी राहू. नंतर मला सेवांमुळे जमणार नाही.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘सध्या आश्रमात साधकांची आवश्यकता आहे. आपण ३ दिवसांनी घराची स्वच्छता करूया का ?’’ त्याचे ते विचार ऐकून मला माझी चूक लक्षात आली. ‘मी किती संकुचित विचार केला !’, असे मला वाटले.
आ. तो एखादा दिवस आश्रमात जाणार नसेल, तर त्याला ‘त्याची सेवा कोण करणार ?’, अशी काळजी असते. वेदांत आश्रमात जाणार नसेल, तर त्याविषयी तो आधीच उत्तरदायी साधकांना सांगतो.
५. स्वतःला पालटण्याची तळमळ
वेदांत आणि आदित्य (वेदांतचा लहान भाऊ) यांना अनेक वेळा सांगूनही त्यांनी पुन्हा तशीच चूक केली; म्हणून एकदा मी त्यांना त्याची जाणीव करून दिली. नंतर वेदांतने ती चूक सुधारली. वेदांत आश्रमातून घरी जाण्याआधी फलकावर स्वतःची चूक लिहितो.
६. त्याला कुठे काही चुकीचे दिसल्यास किंवा जाणवल्यास तो लगेच तसे सांगतो.
७. रामनाथी आश्रमात आल्यापासून वेदांतमध्ये जाणवलेले पालट
अ. त्याची चिडचिड न्यून झाली आहे.
आ. तो गुणसंवर्धनासाठी प्रयत्न करतो.
इ. त्याला सेवा परिपूर्ण केल्याविना चैन पडत नाही.’ (१५.७.२०२१)
सौ. अंजली मनोहर राऊत (आजी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आश्रमाप्रतीचा भाव
‘एकदा त्याच्या आजोबांनी (श्री. मनोहर राऊत यांनी) त्याला विचारले, ‘‘तुला पनवेलहून काही पाठवू का ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘आम्हाला आश्रमात सगळे मिळते. आम्हाला काही नको. आश्रमात सगळे आमची काळजी घेतात.’’ (१५.७.२०२१)
कु. वेदांतचे स्वभावदोष
‘ऐकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती अल्प असणे अन् अधिकारवाणीने वागणे.’ – सौ. समृद्धी राऊत (१५.७.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |