नागपूर येथील न्यायाधिशांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी सासू सासर्‍यासह तिघांना अटक !

पतीसह दोघे पसार !

हुंडाबंदी कायदा असूनही त्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचा परिणाम ! जिथे सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात असेल, तेथे देशातील सर्वसामान्य विवाहित मुलींची हुंड्याविषयी काय स्थिती असेल ? हुंडा घेणार्‍यांवर कठोर कारवाईच हवी.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांची मुलगी करिश्मा यांचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी सासू आणि सासरे अन् अन्य तिघे यांविरुद्ध १ ऑगस्ट या दिवशी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (‘ॲट्रॉसिटी’चा) गुन्हा नोंद केला आहे.

करिश्मा यांचे सासरे पुरुषोत्तम दरोकर, सासू ललिता दरोकर आणि संजय टोंगसे, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. करिश्मा यांचे पती पलाश पुरुषोत्तम दरोकर  आणि प्रशांत टोंगसे, अशी पसार आरोपींची नावे आहेत. ‘करिश्मा यांचा विवाह पलाश यांच्याशी झाल्यानंतर पती, सासू, सासरे, पतीचे मामा आणि मामेभाऊ हे हुंड्यासाठी त्यांचा छळ करत होते’, असे करिश्मा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पसार झालेल्या २ आरोपींचा शोध चालू आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव करत आहेत.