सहजता आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या केरळ येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. रश्मी परमेश्वरन् !
१. ‘दिसेल ते कर्तव्य’, याप्रमाणे आचरण करणे
‘एकदा केरळ सेवाकेंद्रातील पायर्यांवर एक खोके ठेवले होते. त्या वेळी ‘हे खोके कुणी ठेवले ? खोक्याचे झाकण कुठे आहे ?’, असे दोन साधक आपापसांत बोलत होते. तेव्हा रश्मीताई तेथे आली. तिने तो खोका उचलून जागेवर ठेवला आणि ती तिच्या पुढील सेवेला गेली. तिच्याकडून ही कृती सहजतेने झाली. या प्रसंगातून मला तिच्यातील ‘दिसेल ते कर्तव्य’, हा गुण लक्षात आला.
२. साधकाने सांगितल्याप्रमाणे खालच्या माळ्यावर जाऊन देवतेचे चित्र आणणे
एकदा मल्याळम् भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या ध्वनीचित्रीकरणाची सेवा चालू होती. तेव्हा सहसाधकाने मला ध्वनीचित्रीकरण कक्षात ठेवण्यासाठी देवतेचे चित्र आणायला सांगितले. त्यासाठी मला खालच्या माळ्यावर जावे लागणार होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘तो साधक स्वतः जाऊन आणू शकतो.’ त्या वेळी रश्मीताईने माझ्या मनातील विचार जाणला आणि ती स्वतः जाऊन देवतेचे चित्र घेऊन आली. नंतर मी ताईला या प्रसंगात माझ्या मनात आलेले विचार सांगितले आणि तिला विचारले, ‘‘तुझ्या मनात कोणते विचार होते की, ज्यामुळे तुझ्याकडून योग्य कृती झाली.’’ तेव्हा रश्मीताईने सांगितले, ‘‘प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे ? मी प्रत्येक कृती त्यांच्यासाठी करत आहे’, असा विचार केला, तर मनात प्रतिक्रिया येत नाहीत आणि गुरुदेवच आपल्याकडून योग्य कृती करवून घेतात.’’
३. रश्मीताईचे साधनेविषयीचे दृष्टीकोन स्पष्ट आहेत. ती साधकांशी तत्त्वनिष्ठतेने वागते.
४. परिस्थिती शांतपणे स्वीकारणे
एकदा रश्मीताई ध्वनीचित्रीकरण केलेल्या धारिकांचे संकलन (व्हिडिओ एडिटिंग) करत होती. धारिका पडताळत असतांना ‘त्यातील काही ‘व्हिडिओ’ पुसले गेले आहेत किंवा त्यांचे ध्वनीमुद्रण झाले नाही’, असे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ताईने मला बोलावून सांगितले, ‘‘यातील काही ‘व्हिडिओ’ पुसले गेले (‘डिलीट’ झाले) आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा ध्वनीचित्रीकरण करावे लागेल.’’ ते ऐकून मला ताण आला; कारण ते ध्वनीचित्रीकरण मी केले होते. तेव्हा मला वाटले, ‘माझ्या चुकीमुळे पुन्हा ध्वनीचित्रीकरण करावे लागणार आणि त्यात साधकांचा वेळ वाया जाणार.’ माझ्या मनाची स्थिती रश्मीताईला समजली. ती म्हणाली, ‘‘काही हरकत नाही. देवाला या प्रसंगातून आपल्याला काहीतरी शिकवायचे असेल. आपण शिकण्याचा प्रयत्न करूया.’’
नंतर मी गुरुदेवांना प्रार्थना केली. त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘व्हिडिओ ‘डिलीट’ झालेले नाहीत.’ मी हे रश्मीताईला सांगितल्यावर तिच्या तोंडवळ्यावर कोणताही पालट झाला नाही. तिने परिस्थिती स्वीकारली आणि ती पुढची सेवा शांतपणे करू लागली. (‘पुन्हा ध्वनीचित्रीकरण करावे लागेल किंवा नाही’, या दोन्ही परिस्थिती तिने स्वीकारल्या. ध्वनीचित्रीकरण पुन्हा करावे लागले, तर रश्मीताईला वेळ द्यावा लागणार होता, तरी तिने ते स्वीकारले होते.)
‘गुरुदेवा, रश्मीताईकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला कृतीत आणता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सुमा पुथलत, केरळ (२८.५.२०२०)