अतीवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात वीज वितरणची १३ कोटी रुपयांची हानी !
११ सहस्र खांब पडले
सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – गत काही दिवसांमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे पाटण, वाई, महाबळेश्वर या तालुक्यांत खांब पडणे, वीजवाहक तारा तुटणे, रोहित्र (ट्रान्सफार्मर) तुटणे यांमुळे मोठी हानी झाली आहे. प्राथमिक अनुमानानुसार १३ कोटी रुपयांची हानी झाली असून ११ सहस्र खांब पडले आहेत.
१. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वीज वितरणची ७ उपकेंद्रे बंद पडली असून ६५ उच्च दाब वीजवाहिन्या तुटल्या होत्या. त्यामुळे ४२३ गावे अंधारात गेली होती. २ सहस्र ५० रोहित्रांची हानी झाली. उच्च दाब वीज वाहिन्यांचे १ सहस्र १२५ खांब पडले आहेत. जिल्ह्यातील ८४ सहस्र १९० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. अजूनही ११ सहस्राहून अधिक ग्राहक अंधारातच आहेत.
२. या हानीची युद्धपातळीवर दुरुस्ती चालू असून भर पावसात चिखल तुडवत वीज वितरणचे कर्मचारी त्यांची कामे करत आहेत. आतापर्यंत ६५ उच्च दाब वाहिन्या पूर्ववत चालू करण्यात आल्या असून ४०९ गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. १ सहस्र ५६४ रोहित्रे दुरुस्त करण्यात आली असून ७३ सहस्र ८९ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
३. दुर्गम भागात खांद्यावर खांब घेऊन वीज वितरणचे कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेत. ज्या ठिकाणी खांब नेणे शक्य नाही, त्या ठिकाणी दोरखंडांच्या साहाय्याने कार्य चालू आहे.