सप्तर्षींनी वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त पूजनासाठी बनवण्यास सांगितलेल्या चित्राची वैशिष्ट्ये !
१. गुरुपौर्णिमेनिमित्त बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण चित्र आणि ते बनवण्यामागील उद्देश
१ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम, श्रीकृष्ण यांची चित्रे आणि सनातनचे तिन्ही गुरु ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांची छायाचित्रे घेऊन वैशिष्ट्यपूर्ण चित्र बनवण्याविषयी सप्तर्षींनी सांगणे : ‘१३.२.२०२१ या दिवशी झालेल्या १७० व्या सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचनात सप्तर्षींनी सांगितले, ‘वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजनासाठी श्रीकृष्ण, श्रीराम यांचे चित्र आणि सनातनचे तिन्ही गुरु ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांची छायाचित्रे घेऊन एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र बनवावे. या चित्राच्या मध्यभागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र घ्यावे. श्रीविष्णूचे अंशावतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही तत्त्वे एकत्रित आहेत; म्हणून गुरुदेवांच्या छायाचित्राच्या वरच्या बाजूला त्यांच्या उजवीकडे श्रीकृष्ण आणि डावीकडे श्रीराम यांची चित्रे घ्यावीत. श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीरामाच्या चित्राच्या खाली श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र घ्यावे. ‘त्या दोघीही बसून गुरुदेवांकडे हात जोडून पहात आहेत’, असे त्या चित्रात दाखवावे.’
१ आ. गुरुपौर्णिमेनिमित्त वैशिष्ट्यपूर्ण चित्र बनवण्यामागील उद्देश सप्तर्षींनी सांगणे : श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे तत्त्व असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य श्रीराम अन् श्रीकृष्ण या दोन्ही अवतारांच्या कार्याप्रमाणेच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अधिकाधिक कार्य निर्गुण स्तरावर चालू असल्याने गुरुदेवांचे चित्र गोलाकारामध्ये घ्यावे. श्रीरामाचा जन्म सूर्यवंशात झाला होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म सूर्यदशेत झाल्याने त्यांच्याभोवती सूर्याची प्रभावळ असावी. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या श्रीकृष्णाप्रमाणे एकाच ठिकाणी राहून कार्य करत आहेत, तर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीरामाप्रमाणे भारतभर प्रवास करून कार्य करत आहेत. त्यामुळेच सप्तर्षींनी या चित्रामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चित्र श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चित्र श्रीरामाच्या चित्राच्या खाली घ्यायला सांगितले आहे.
२. गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आणि षोडशोपचार पूजन
२३.७.२०२१ या दिवशी सकाळी सर्व साधकांच्या वेळेनुसार पूजनाचा कार्यक्रम करावा. या कार्यक्रमात प्रथम श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीराम, श्रीकृष्ण आणि सनातनचे तिन्ही गुरु असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे षोडशोपचार पूजन करावे. पूजनाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पांढर्या रंगाची रेशमी साडी नेसावी.’
– श्री. विनायक शानभाग, देहली (७.७.२०२१)