श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत असणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्राचे आध्यात्मिक महत्त्व !
‘गुरूंचे महत्त्व अगाध आहे. गुरूंची महती सांगण्यासाठी शब्दही थिटे पडतात. संत कबीर म्हणतात, ‘जर माझ्या समोर गुरु आणि गोविंद हे दोन्ही उभे राहिले, तर मी प्रथम गुरूंनाच वंदन करणार; कारण गुरूंमुळे मला गोविंदाचे महत्त्व लक्षात आले’. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरही गुरूंचा महिमा सांगतांना म्हणतात, ‘परीस केवळ लोखंडाला सोने करतो; परंतु गुरु कुणालाही सोने करतात. अशा गुरूंचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरुपौर्णिमेला पूजन केलेल्या चित्राचीही अशीच गुणवैशिष्ट्ये आहेत. ती आता आपण समजून घेऊया.
१. चित्रात सर्वांत वर असलेले भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम यांचे आध्यात्मिक महत्त्व
या चित्रात सर्वांत वरती भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या बाजूला प्रभु श्रीराम आहेत. त्यांचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे.
१ अ. भगवान श्रीकृष्णाच्या चित्राचे महत्त्व आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कार्य : भगवान श्रीकृष्ण हे पूर्णत्वाचे प्रतीक आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य पूर्णत्वास नेण्याचे उत्तरदायित्व त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दिलेले आहे. त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देश-विदेशातील साधकांना स्थुलातून मार्गदर्शन आणि कृष्णनीतीचा प्रसार करून व्यष्टी स्तरावर साधकांच्या हृदयात अन् समष्टी स्तरावर संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कृतीप्रवण करत आहेत.
१ आ. प्रभु श्रीरामाच्या चित्राचे महत्त्व आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कार्य : प्रभु श्रीरामाने वनवासात असतांना संपूर्ण भारतात भ्रमण करून ऋषिमुनींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले अन् विविध ठिकाणी असणार्या आसुरी शक्तींचा नाश केला. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामाप्रमाणे कठोर धर्माचरण करून पृथ्वीवर लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी भारत आणि विदेश येथील विविध देवतांच्या तीर्थक्षेत्री जाऊन तेथील देवतांचे कृपाशीर्वाद मिळवत आहेत.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चित्रामध्ये गुरुपूजन केल्याचे दाखवण्यामागील आध्यात्मिक महत्त्व
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरुपूजन केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मध्ये भूदेवीचे तत्त्व कार्यरत आहे. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून भूदेवीकडे कृपेचा ओघ चालू झाला. श्रीविष्णूचे अंशावतार असणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपाळू दृष्टी या भूमीवर पडल्यामुळे भूदेवीला श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कृष्णस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पूजन केले, तेव्हा सूक्ष्मातून कृष्णस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निळसर रंगाच्या दैवी उजव्या पावलाचा स्पर्श भूमीला झाला. त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्यमय लहरी व्यापक होऊन संपूर्ण धराच चैतन्यमय झाली आणि तिच्यावरील पापाचा भार न्यून झाला. ‘पृथ्वीची मनुष्याने केलेल्या पापाचा भार सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे आता पृथ्वीवर पंचमहाभूतांचा प्रकोप होऊन आपत्काळ चालू होणार’, अशी आकाशवाणी सूक्ष्मातून झाली. (प्रत्यक्षात भारतात आणि अन्य देशांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे हाहाःकार माजलेला असून अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे.’ – संकलक)
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुपूजन केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्रीदेवीचे तत्त्व कार्यरत आहे. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या चरणातून तारक-मारक स्वरूपातील शक्तीचे प्रक्षेपण संपूर्ण विश्वात झाले. या शक्तीचे प्रक्षेपण वातावरणात झाल्यामुळे वातावरणाची शुद्धी झाली आणि पाताळातील आसुरी शक्तींवर श्रीविष्णूच्या तारक-मारक शक्तीचा आघात झाल्यामुळे ३० टक्के वाईट शक्तींचा विनाश झाला. श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीकडून संपूर्ण विश्वात चैतन्यमय लहरींचे प्रक्षेपण झाल्यामुळे कालचक्रावर त्याचा परिणाम होऊन विपरित दिशेने फिरणारे कालचक्र ईश्वरी कार्याला अनुकूल झाले. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या निर्गुण चैतन्यामुळे या कालचक्राची गती संचालित झाली आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या धर्मशक्तीमुळे कालचक्रासह धर्मचक्र कार्यरत झाले. आता कालचक्र आणि धर्मचक्र परस्पर पूरक झाल्यामुळे पृथ्वीवर स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले या तिन्ही गुरूंचे आध्यात्मिक महत्त्व
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या विराटपुरुष किंवा धर्मपुरुष याची चंद्रनाडी, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सूर्यनाडी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले सुषुम्नानाडी आहेत. विराट पुरुषाची सूर्यनाडी चालू झाल्यामुळे संपूर्ण विश्वातील रज-तम न्यून होत आहे, चंद्रनाडी कार्यरत झाल्यामुळे विश्वातील सात्त्विकता वाढत आहे आणि सुषुम्नानाडी कार्यरत झाल्यामुळे विश्वातील सात्त्विक जिवांवरील मायेचा प्रभाव न्यून होऊन लोक धर्माचरण अन् साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी उद्युक्त झाले आहेत. अशा प्रकारे तिन्ही गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे केवळ पृथ्वीवरील मनुष्याचाच नव्हे, तर पृथ्वीसह अन्य लोकांमध्ये निवास करणार्या विविध जिवांचा उद्धार होत आहे. पृथ्वीवर पंचमहाभूतांचा प्रकोप झाल्यावर केवळ या तिन्ही गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे देश-विदेशातील अनेक साधकांचे रक्षण होणार आहे.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२१)
तिन्ही गुरूंची कृपा काय वर्णावी !सनातनचे तिन्ही गुरु (टीप १) । तिन्ही गुरू साधकांवर कृपा करती । तिन्ही गुरूंमध्ये एकवटले धर्मतेज । श्रीविष्णु आले भूदेवी आणि श्रीदेवी यांसह (टीप २) । राष्ट्रामध्ये केली धर्मरूपी प्राणाची स्थापना । टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले. टीप २ – महर्षींनी नाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भूदेवीचा आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीदेवीचा अवतार आहेत. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले हे तिरुपती बालाजी, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या पद्मावती आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या महालक्ष्मी यांचा अवतार आहेत. – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२१) |