पुणे येथील शास्त्रज्ञांकडून रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – एबेल २०६५ या नावाने ओळखल्या जाणार्‍या आकाशगंगा समूहातील एका रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांना लागला आहे. हे संशोधन पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. धर्मवीर लाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. नारायणगावजवळील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बिण) आणि चंद्रा एक्सरे वेधशाळा यांचा यासाठी उपयोग करण्यात आला. हे संशोधन अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलच्या १६ जुलै या दिवशीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.

रेडिओ आकाशगंगेविषयी थोडक्यात माहिती –

सक्रीय आकाशगंगेच्या मध्यभागी सूर्याच्या वस्तूमानाच्या दशलक्ष ते अब्ज पट वस्तूमानाचे अतीघन कृष्णविवर (ब्लॅक होल) असावे, असा शास्त्रज्ञांचा विश्‍वास आहे. अतीघन कृष्णविवर आसपासच्या भागातून अधिक सामग्री आकर्षित करतात, तसेच तेही केंद्रकामधून लाखो प्रकाशवर्षे दूरपर्यंत सामग्री आणि ऊर्जेचे लोट बाहेर फेकतात. अशा आकाशगंगांचा सक्रीय टप्पा कित्येक दशलक्ष वर्षे टिकू शकतो. त्यानंतर केंद्रकातील आण्विक प्रक्रिया थांबून रेडिओ उत्सर्जन नष्ट होण्यास आरंभ होतो. रेडिओ आकाशगंगांचा हा चरण सक्रीय आकाशगंगांचा अंत होण्याचा शेवटचा टप्पा दर्शवतो. तो बहुतेकदा अवशेषीय किंवा अंतिम टप्पा म्हणून संबोधला जातो. या शोधामुळे अवशेषीय आणि पुनर्जीवित रेडिओ आकाशगंगांच्या उत्क्रांतीवर अन् सक्रीय आकाशगंगांच्या कालचक्रावर प्रकाश पडेल.