वृक्षतोड बंदी असतांनाही सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत १६ सहस्र झाडे तोडली !
|
सावंतवाडी – सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांतील वृक्षतोड बंदी असलेल्या क्षेत्रातील सुमारे १६ सहस्र झाडे तोडल्याचा खळबळजनक प्रकार माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीमुळे उघड झाला आहे. या घटनेत संबंधितांवर कडक कारवाई न करता किरकोळ दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवैधपणे तोडण्यात आलेली झाडे सरकारकडे जमा करणे बंधनकारक असतांना ‘ही झाडे जाग्यावरच जाळून टाकण्यात आली’, असा खोटा पंचनामा करून बोगस अनुज्ञप्तीच्या आधारे लाकडांची वाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये ‘अर्थ’पूर्ण तडजोड झाल्याचा संशय असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बरेगार म्हणतात की, वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्षतोड अधिकारी, दोडामार्ग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या वृक्षतोड बंदीचे गांभीर्य लक्षात घेतलेले नाही. त्यांनी अवैध वृक्षतोड करणार्यांवर कारवाई करणे आवश्यक होते. विशेष म्हणजे अवैधपणे तोडलेली झाडे सरकारजमा करणे आणि संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करणे, हे शासकीय अधिकार्यांचे कर्तव्य होते. असे असतांना त्यांनी संबंधितांना किरकोळ दंड आकारल्याचे समोर आले आहे.
संबंधित वन अधिकार्याचे कोकणातून संभाजीनगरला स्थानांतर झाले आहे; मात्र या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याच्या स्थानांतराच्या आदेशावर कार्यवाही न करता तो रहित करावा, अशा अधिकार्यास बढती देऊ नये, तसेच त्याच्याकडील कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी बरेगार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.