(म्हणे) ‘दोन ग्रहांच्या युतीचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही !’ – पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांचे अज्ञानमूलक विधान
सांगली – ‘दोन ग्रहांची युती झाल्यावर काही होते’, हा विचार अयोग्य आहे. दोन ग्रहांच्या युतीचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, असे अज्ञानमूलक विधान पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी केले. (‘दोन ग्रहांच्या युतीचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही’, हे सोमण कशाच्या आधारे सांगत आहेत ? याचा त्यांनी काही अभ्यास केला आहे का ? – संपादक) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २७ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या ‘फलज्योतिष आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समाजावरील प्रभाव’, या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकाचे अनुवादक डॉ. विश्वास सहस्रबुद्धे आणि अंनिसचे सांगली येथील प.रा. आर्डे हेही सहभागी झाले होते.
सोमण पुढे म्हणाले, ‘‘फलज्योतिष ग्रंथात कालसर्पयोग याविषयी लिखाण आहे; मात्र आता ते कालबाह्य झाले आहे. सध्या त्यात काहीही तथ्य नाही. असे असले, तरी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. (‘हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक विधींत तथ्य नाही’, असे बरळणारे म्हणे पंचांगकर्ते ! एकीकडे कालसर्पयोगाचे संदर्भ अमान्य करायचे आणि दुसरीकडे ‘हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे’, असेही सांगायचे, हा दांभिकपणा नव्हे का ? वैचारिक गोंधळ असलेले असे पंचांगकर्ते समाजाला काय दिशा देणार ? – संपादक) पंचांग हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन काळापासून भारतियांना माहिती असलेले हे खगोलीय गणित आहे. ५ सहस्र वर्षांपेक्षाही पूर्वी पंचांग अस्तित्वात असून पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक आहे.’’
(म्हणे) ‘ज्योतिष हे छद्मविज्ञान आहे !’ – प्र.रा. आर्डे, अंनिस
या वेळी प्र.रा. आर्डे म्हणाले, ‘‘ज्योतिष हे छद्मविज्ञान आहे. (ज्योतिषशास्त्राचा कुठलाही अभ्यास न करता त्याला ‘छद्मविज्ञान’ म्हणणारे प्राचीन भारतीय शास्त्रांचाच अवमान करत आहेत. अंनिसने असे विधान कधी अन्य पंथियांच्या प्राचीन ग्रंथांसंदर्भात करण्याचे धाडस दाखवले आहे का ? आतापर्यंत ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या घटना सत्य झाल्याची सहस्रावधी उदाहरणे आहेत. असे असतांना हे शास्त्र नाकारणे, हाच छद्मपणा आहे ! – संपादक) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमात समावेश करणे अयोग्य आहे. ज्योतिषाचा सध्या व्यवसाय झाला आहे. त्याला धार्मिक अस्मिता जोडण्यात आली आहे. दुर्दैवाने सरकारी पातळीवर याला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कायद्याच्या चाकोरीत आपण याला विरोध करायला हवा आणि अधिकाधिक लोकांना आपल्या विचारधारेत सहभागी करून घ्यायला हवे.’’
फेसबूकवरून प्रक्षेपित झालेल्या या परिसंवादाला केवळ १८ दर्शकांची ‘ऑनलाईन’ उपस्थिती !
हा परिसंवाद ‘झूम ॲप’, तसेच ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता. फेसबूकवरून प्रक्षेपित होणार्या या परिसंवादाला केवळ १८ दर्शक ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. यावरून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीशी सामान्य माणूसही नाही’, हेच स्पष्ट होते. (यावरून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीशी सामान्य माणूसही उभा नाही, तसेच लोकांना अंनिसचा छद्मवैज्ञानिक दृष्टीकोनही पटलेला नाही आणि ते अशा दृष्टीकोनांचा त्याग करत आहेत’, हे सिद्ध होते ! – संपादक)