गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सनदी लेखापाल कह्यात !
पुणे – शेअर बाजारातील गुंतवणुकीवर १८ ते २२ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून चारशेहून अधिक नागरिकांची १६ कोटी १६ लाख ९५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सनदी लेखापालास कह्यात घेतले आहे. (आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अधिक संख्येत होत असल्याने नागरिकांनी त्याविषयी सावध रहावे. – संपादक) न्यायालयाने त्यांना २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण कायदा (एम्.पी.आय.डी.) न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस्.एस्. गोसावी यांनी हा आदेश दिला आहे. कैलास मुंदडा असे पोलीस कोठडी सुनावलेल्या सनदी लेखापालाचे नाव असून या प्रकरणातील मुख्य आरोपी महेशकुमार लोहिया न्यायालयीन कोठडीत आहे. फसवणुकीचा हा प्रकार नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत शुक्रवार पेठ परिसरात घडला. मुंदडा यांनी गुंतवणूकदारांना लाभ होण्याचे आमीष दाखवून लोहिया यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फसवणूक झालेले काही गुंतवणूकदार मुंदडा यांचे ग्राहक आहेत. गुंतवणूकदारांना संशय येऊ नये; म्हणून मुंदडा यांनी प्राप्तीकर भरण्यासही ग्राहकांना भाग पाडले. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारुति वाडेकर यांनी केली असून न्यायालयाने ती मान्य केली आहे.