पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळी पू. शिवाजी वटकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे
१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर साजरा होणे
‘सध्या आपत्काळ चालू असल्याने आश्रमात वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र भेटणे, प्रसाद किंवा खाऊ देणे शक्य होत नाही. सनातनच्या देवद आश्रमामध्ये पू. अश्विनीताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना देवद आश्रमातील संत अन् काही साधक कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून भेटले. त्या वेळी साधकांनी त्यांच्यावर रचलेल्या कविता त्यांना वाचून दाखवल्या. त्यांच्यासमोर आणि संत अन् साधक यांच्या उपस्थितीत कविता वाचतांना सर्वांचा भाव जागृत झाला. त्या वेळी कसलाही कार्यक्रम आयोजित केला नव्हता. केवळ साधकांनी केलेल्या कविता आणि सनातन परिवाराच्या वतीने एक लहानसा खाऊचा पुडा पू. ताईंना भेट म्हणून देण्यात आला. स्थुलातून इतर काहीच केले नाही; मात्र ‘ते सर्व आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर झाले’, असे मला वाटले.
२. व्यवहारामध्ये वाढदिवसानिमित्त लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपये व्यय करत असून आश्रमात मात्र अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरे होणे
व्यवहारामध्ये वाढदिवसानिमित्त काही जण सहस्रो किंवा लक्षावधी रुपये व्यय करतात आणि पुष्कळ वेळही अशा कार्यक्रमांसाठी वाया घालवतात. पाच वर्षांपूर्वी मी एका लोकप्रतिनिधीकडे सहसाधकांसमवेत संपर्कासाठी गेलो होतो. ते ‘एक बोट’ वर करून दुसर्या एका लोकप्रतिनिधीला म्हणाले, ‘‘माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी एवढा व्यय झाला.’’ ‘एक बोट’ म्हणजे ‘अधिकाधिक एक लक्ष रुपये असू शकतात’, असे मला वाटले; मात्र त्यांनी एका कलाकाराच्या चमूला त्या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी १५ लाख रुपये दिल्याचे आणि इतरही काही व्यय सांगितल्यावर ‘एक बोट’ म्हणजे ‘१ कोटी रुपये होते’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला आश्चर्याचा धक्का बसला. याउलट आश्रमातील एका संतांचा वाढदिवस साजरा करतांना काहीच व्यय झाला नाही. ‘केवळ १५ मिनिटांचा वेळ देणे आणि पाव किलो मिठाई देणे’ एवढेच करण्यात येते. ‘येथे वेळ आणि गुरुधन यांचा काटकसरीने व्यय करण्यात आला होता’, हे मला शिकायला मिळाले.
३. आश्रमात संतांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केल्यानंतर साधकांनी आनंदाने आणि शांततेने एकत्र रहाण्याच्या संदर्भात एक बोधकथा आठवणे
आश्रमात एखाद्या साधकाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर उपस्थित १० ते १२ साधकांना आम्ही प्रत्येकी एक चॉकलेट किंवा एक चमचा सुतारफेणीचा गोड खाऊ देत असू; मात्र सध्या आपत्काळ असल्याने पू. ताईंच्या वाढदिवसाला तेही केले नाही. याविषयी कोणी काही बोलले नाही. मलाही याविषयी विचारावेसे वाटले नाही. याचे मला आश्चर्य वाटले आणि मला पुढील बोधकथा आठवली.
३ अ. गावात २० जणांचे एकत्रित कुटुंब एकोप्याने रहात असल्याने त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास असणे : एका गावात २० जणांचे एक कुटुंब एकत्रित रहात होते. त्यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुले आनंदाने आणि एकोप्याने रहात होते. सर्वांत मोठा भाऊ कर्ता पुरुष होता आणि सर्व कुटुंबीय त्याचे ऐकत असत. सर्वजण मिळूनमिसळून रहात होते. त्यांच्याकडे धनधान्य आणि सुबत्ता होती. लक्ष्मी त्यांच्या घरी नांदत होती.
३ आ. चंचल लक्ष्मीने कुटुंबियांमध्ये वाद निर्माण करण्याचे ठरवून तेथून निघून जाण्याचे ठरवणे : लक्ष्मी चंचल असते. सहसा एका ठिकाणी टिकत नाही. या तिच्या स्वभावानुसार लक्ष्मीला वाटले, ‘मी इथून निघून जायला पाहिजे.’ लक्ष्मीने ठरवले, ‘आपण इथून जाण्यासाठी कुटुंबियांमध्ये विकल्प आणि भांडणे निर्माण करायची.’ त्यासाठी तिने नियोजन केले. स्वयंपाकघरात भाजी शिजत आली असतांना सर्वांत मोठ्या भावाच्या पत्नीने त्या भाजीमध्ये मीठ घातले आणि ती तेथून निघून गेली. थोड्या वेळाने दुसरी महिला तेथे आली आणि तिनेही त्यात मीठ टाकले. त्यानंतर तिसरीनेही त्यात मीठ घातले. परिणामी भाजीमध्ये नेहमीपेक्षा तिप्पट मीठ घातले गेले.
३ इ. भाजी तिप्पट खारट होऊनही कुटुंबियांनी ती नेहमीप्रमाणे खाल्ल्यामुळे विकल्प निर्माण न होणे आणि लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होणे : नेहमीप्रमाणे तिन्ही भाऊ जेवायला बसले. सर्वांत मोठ्या भावाने पहिला घास घेतला. तेव्हा त्याला भाजी पुष्कळ खारट लागली. ‘काहीतरी चूक झाली असेल’, असे समजून कुठलीही प्रतिक्रिया न देता त्याने नेहमीप्रमाणे भोजन करणे चालू ठेवले. मधल्या भावालाही भाजी पुष्कळ खारट लागल्याने ‘ती खाऊ नये’, असे त्याला आरंभी वाटले; मात्र ‘माझा मोठा भाऊ जो कर्ता आहे, तो मुकाट्याने नेहमीप्रमाणे जेवण करत आहे, तर मीही तसेच केले पाहिजे’, असे ठरवून तो शांतपणे जेवत होता. तिसर्या भावालाही ‘भाजी खारट असल्याने खाऊ नये’, असे वाटले; पण ‘माझे दोघे मोठे भाऊ काही म्हणत नाहीत, तर मी का मनात विकल्प आणू ?’, असे वाटून तोही आनंदाने जेवला. अशा रितीने घरातील सर्वजण नेहमीप्रमाणे जेवले. कोणीच काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही किंवा तो वादाचा विषय झाला नाही. असे इतर प्रसंगांच्या संदर्भातही झाले. त्यामुळे लक्ष्मी हरली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन ती त्यांच्या घरीच राहिली.
४ . परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचे सनातन संस्थेमध्ये अस्तित्व जाणवणे
वरील गोष्टीत २० जणांचे एकत्र कुटुंब होते. सनातन संस्थेच्या देवद आश्रमात तर अनुमाने १०० जणांचे, तर रामनाथी गोवा, येथील आश्रमात २५० जणांचे एकत्र कुटुंब आहे. पू. अश्विनीताईंच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट्स किंवा खाऊ मिळाला नाही, तरी सर्व संत आणि साधक यांनी शांतपणे अन् आनंदाने वाढदिवस साजरा केला. त्याविषयी कोणालाच काही वाटले नाही. असेच सर्व प्रसंगांत होते.
भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथील सर्व साधकांमध्ये आत्मीयता अन् एकात्मता आहे. यामुळे सनातन संस्थेला आदिशक्तीचा आशीर्वाद असून तेथे लक्ष्मी नांदते. एवढेच नव्हे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (अर्थ : सर्व पृथ्वी हेच कुटुंब आहे.) ही भावनाही निर्माण केली आहे. सनातन संस्था अध्यात्म प्रसाराचे कार्य करते. त्यासाठी महासरस्वतीचा आशीर्वाद आहे. संस्थेच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केले जाते आणि त्यासाठी तिला महाकालीचाही आशीर्वाद आहे.
यावरून ‘सनातन संस्थेमध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या आदिशक्ती कार्यरत आहेत’, असे वाटते. हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने होत आहे. त्यासाठी आदिशक्ती आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१५.१२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |