५ वर्षांत ५२८ कोटींहून अधिक रुपये व्यय करून ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत ६२ प्रकल्पांपैकी केवळ १२ प्रकल्पच मार्गी !
कोट्यवधी रुपयांचा व्यय होऊनही ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत येणारे प्रकल्प पूर्ण न होणे हे गंभीर आहे. कोट्यवधी रुपये कुठे गेले ?, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्यास चूक ते काय ?
पुणे – ‘स्मार्ट सिटी’ने ५ वर्षांत ५ सहस्र कोटींचे ६२ प्रकल्प प्रस्तावित केले होते; मात्र त्यातील केवळ १२ प्रकल्प मार्गी लागले आहेत. महापालिका आणि ‘स्मार्ट सिटी’ यांच्यातील वर्चस्ववादात शहराशी निगडित असलेले प्रकल्प रखडल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे. ‘स्मार्ट सिटी’ला एकूण ६१३ कोटी रुपये मिळाले असून त्यांपैकी ५२८ कोटी ७९ लाख रुपये व्यय केल्याचे ‘स्मार्ट सिटी’ प्रशासनाकडून सांगितले आहे.
५ वर्षात ‘स्मार्ट सिटी’ने औंध, बाणेर आणि बालेवाडी येथील रस्त्यांवर सर्वाधिक व्यय केला; पण रस्ता रुंदीकरण आणि रस्ते विकसन होत असतांना महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले नसल्याचे चित्र आहे. प्रस्तावित ६२ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्प वाहतुकीशी संबंधित, १० प्रकल्प पाणीपुरवठ्याशी संबंधित, ३ घनकचरा प्रकल्प, नागरिकांचे रहाणीमान उंचावण्यासाठी १२ प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसनाचे ४ प्रकल्प, ‘ई-गव्हर्नन्स’साठी ४ प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रत्येकी १ प्रकल्प, तसेच सोलर आणि ‘ट्रान्सपोर्ट हब’च्याही प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. ‘स्मार्ट सिटी’ने ४६२ कोटी प्रकल्पांवर व्यय झाले असून ६५ कोटी ८६ लाख रुपयांचा व्यय प्रशासकीय गोष्टींवर झाल्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी ३४ कोटींचा निधी तर शहरात लावलेल्या ‘डिस्प्ले बोर्ड’साठी ९२ कोटींचा निधी व्यय झाला आहे.