चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) येथील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !
मुंबई – अतीवृष्टीमुळे रत्नागिरीतील चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे शहर आणि ग्रामीण भागांतील काही क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी सर्व साहित्य खराब झाले. अशा वेळी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने पूरग्रस्तांना साहाय्य व्हावे म्हणून हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत २ सहस्र ३०२ नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असून यामध्ये तेल, तांदूळ, पीठ, मसाले, कांदे, बटाटे, मेणबत्त्या, काडेपेटी आदींचा समावेश आहे.
१. चिपळूण शहरातील मुरादपूर भोईवाडी, मुरादपूर साई मंदिर विभाग, शंकरवाडी, तसेच ग्रामीण भागातील दादर, कादवड या भागांत २ ठिकाणी पूल पडल्याने तेथे साहाय्यता कार्यात अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी पर्यायी मार्गाने साहाय्यता पोचवण्यात आली. तसेच भूस्खलनामुळे विस्थापित झालेल्या ओवळी (सुकीवलीवाडी) येथील जनतेला, तसेच दादर आणि दादर कादवड येथे घरे वाहून गेलेल्या कुटुंबियांना साहाय्य करण्यात आले.
२. २८ जुलै या दिवशी ‘सुसंस्कृत ग्रूप मिरजोळे, रत्नागिरी’, ‘श्रीनगर उत्सव मंडळ, रत्नागिरी’आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनुक्रमे दळवटणे बागवाडी आणि समर्थनगर सती येथे साहित्य वाटप करण्यात आले.
३. २९ जुलै या दिवशी चिपळूण तालुक्यातील मजरे काशी येथील भुवडवाडी, साळुंखेवाडी, पेडणेकरवाडी आणि चिपळूण शहरातील कुंभारवाडी या भागांत पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात आले. या वेळी पूरग्रस्तांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर देण्यात आला.