आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांविरोधात गुन्हा नोंद
विवाह सोहळ्यात सहस्रोंची गर्दी केल्याचे प्रकरण
सोलापूर – बार्शी येथील भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाहसोहळा २५ जुलै या दिवशी पार पडला. या सोहळ्यासाठी सहस्रो नागरिकांची गर्दी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आयोजक योगेश पवार या एका व्यक्तीवर गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता आमदार राजेंद्र राऊत यांची दोन्ही मुले रणजीत राजेंद्र राऊत आणि रणवीर राजेंद्र राऊत यांच्यावरही गुन्हा नोंद केला आहे. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदार उपस्थित होते.
केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्यास हरकत नसल्याची लेखी समज पोलिसांनी योगेश पवार यांना दिली होती; मात्र प्रत्यक्षात सहस्रोंच्या संख्येने लोक या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. पोलिसांनी केवळ आयोजकांवर गुन्हा नोंद केला होता. यावर ‘सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यात वेगळा न्याय, असे का ?’, असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी उपस्थित केला होता.
बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर कोरोना नियमांचे उल्लंघन करत विवाह सोहळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..#RajendraRaut #Barshi #Lockdown #Corona @journalistaftabhttps://t.co/DJHcFK5VSQ
— ABP माझा (@abpmajhatv) July 29, 2021