कोविड केअर सेंटरमधील रुग्णांनी वापरलेले साहित्य इतरत्र फेकल्याने ग्रामस्थ त्रस्त !
संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
जनतेला दिसते ते न दिसणारे डोळे असून आंधळे प्रशासन !
सावंतवाडी – तालुक्यातील शेर्ले आणि कास गावांच्या सीमेजवळ असलेल्या ‘डिवायन मर्सी कोविड केअर सेंटर’मध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णांनी वापरलेल्या साहित्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्याने हा कचरा आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे. प्रशासन मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने या परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना दिलेल्या न्याहारीचे प्लास्टिकचे कागद, पिशव्या, पत्रावळी (कागदी प्लेट) आदी कचरा एकत्र करून तेथे असलेल्या खड्ड्यात न टाकता तो बाहेर टाकला जात आहे. याविषयी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना कळवले असता त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी लक्ष घालून संबंधित कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.