कोरोनाशी लढणार्यांच्या पाठिशी शिवसेना नेहमीच असेल ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना
उचगाव (जिल्हा कोल्हापूर), २९ जुलै – कोरोनाशी लढणार्यांच्या पाठिशी शिवसेना नेहमीच असेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी केले. कोरोनाशी चार हात करणारे आधुनिक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ‘आशा’ स्वयंसेविका, पत्रकार यांना येणार्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी उचगाव (तालुका करवीर) येथे करवीर शिवसेनेच्या वतीने संबंधित सर्व घटकांची संयुक्त बैठक झाली. त्यात श्री. संजय पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख श्री. राजू यादव होते.
बैठकीनंतर वरील सर्वांना श्री. संजय पवार आणि श्री. राजू यादव यांच्या हस्ते छत्री, रेनकोट आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सामान्यजनांची सेवा बजावणार्या घटकांना साहाय्य करण्यासाठी शिवसेना नेहेमीच आघाडीवर आहे.’’ या वेळी सर्वश्री पोपट दांगट, दीपक पाटील, दीपक रेडेकर, विनायक जाधव, अर्चना करी महादेव चव्हाण, स्वाती यादव, संतोष चौगुले, बाळासाहेब नलवडे, विराग करी, योगेश लोहार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी यांनी केले, तर श्री. अजित चव्हाण यांनी आभार मानले.