पंढरपूर येथील श्री. अप्पासाहेब सांगोलकर आणि त्यांची नात चि. देवांशी नीलेश सांगोलकर यांना वायुदेवतेविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
पंढरपूर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अप्पासाहेब सांगोलकर आणि त्यांची नात ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. देवांशी नीलेश सांगोलकर यांना वायुदेवतेविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. ‘नामजप करतांना ‘पायाला थंड लागत आहे’, असा विचार मनात आल्यावर अकस्मात् ७ फूट अंतरावरून एक हिरवे ‘मॅट’ सरकत स्वतःच्या पायापर्यंत येणे आणि त्याचे छायाचित्र काढायचे मनात येताच ७ वर्षांची नात कु. श्रेयसी हिने तिथे येऊन छायाचित्र काढणे अन् त्या प्रसंगी ‘हे सर्व देवाचेच नियोजन होते’, असे लक्षात येणे
‘४.७.२०२० या दिवशी सकाळी ७.१५ ते ९.१० या वेळेत मी आगाशीत बसून नामजप करत होतो. देवाने माझ्या मनात विचार घातला, ‘पायाला थंड लागत आहे.’ त्या क्षणी माझ्यापासून अनुमाने ७ फूट अंतरावर असलेले भूमीवर घालायचे हिरवे ‘मॅट’ देवाच्या कृपेने अकस्मात् सरकत मी बसलेल्या ठिकाणी माझ्या पायाखाली आले. तेव्हा मी त्याच्यावर पाय ठेवून कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या मनात पुन्हा देवानेच विचार घातला, ‘एवढे देव आपल्यासाठी करतो, तर आपण याचे छायाचित्र काढायला हवे.’ तेव्हा मी एकटाच आगाशीत होतो. माझी नात कु. श्रेयसी (वय ७ वर्षे), दुसरी नात चि. देवांशी (वय २ वर्षे) आणि इतर कुटुंबीय खाली घरातच होते. तेव्हा देवानेच माझ्या मनात विचार घातला, ‘याचे छायाचित्र कोण काढणार ? आता दोन्ही नाती आगाशीत येतील का ?’ क्षणार्धात् भगवंतानेच त्या दोघींना आगाशीत पाठवले. तेव्हा माझी मोठी नात कु. श्रेयसी हिला मी विचारले, ‘‘तुला भ्रमणभाषद्वारे छायाचित्र काढता येईल का ?’’ तेव्हा तिने ‘हो’, असे म्हणून छायाचित्र काढले. नंतर ‘हिरवे ‘मॅट’ माझ्यापासून किती अंतरावर होते ?’, हे कळण्यासाठी माझा मुलगा नीलेश (अधिवक्ता निलेश सांगोलकर) याने दुसरे छायाचित्र काढले. त्या वेळी ‘हे सर्व देवाचेच नियोजन होते’, हे माझ्या लक्षात आले. नंतर श्रेयसी मला म्हणाली, ‘‘सकाळी ८.३० वाजता आम्ही दोघी बहिणी या हिरव्या ‘मॅट’वर खेळत बसलो होतो. हे हिरवे ‘मॅट’ तुमच्या पायाखाली कुणी दिले ? ’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘तुम्ही घरात गेल्यानंतर माझ्या पायाला थंड लागू नये, यासाठी देवकृपेनेच हिरवे ‘मॅट’ सरकत माझ्यापर्यंत आले.’’ त्या वेळी ही अनुभूती ऐकून तिलाही आनंद झाला.
२. लहान नातीला गरम होत असतांना वार्याला प्रार्थना करून हाक मारताच वार्याची झुळूक येणे आणि ते ऐकून नातीने बोबड्या स्वरात ‘हवा ये गं मला गमनी (गर्मी) होते’, असे म्हणताच लगेच वार्याची झुळूक येत असल्याची अनुभूती नातीलाही येणे
४.७.२०२० या दिवशी माझी लहान नात चि. देवांशी माझ्या समवेत ‘व्हरांड्या’मध्ये बसण्यासाठी आली. तिला स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे ती मला म्हणायची, ‘‘अजू (आजोबा), मला गमनी (गर्मी) होते.’’ मी म्हणालो, ‘‘हवा (वारा) ये गं ! मला आणि देवांशीला गमनी होत आहे.’’ तेव्हा वारा नसतांनाही देवाच्या कृपेने लगेच वार्याची झुळूक आली. जेव्हा जेव्हा मी वार्याला प्रार्थना करून हाक मारायचो, तेव्हा तेव्हा वार्याची झुळूक येऊन मला आनंद मिळायचा. नंतर देवांशी एकटीच वार्याला म्हणायची, ‘‘हवा ये गं, मला गमनी होते.’’ त्या वेळीही ‘वारा त्वरित यायचा’, अशी अनुभूती देवच चि. देवांशीला देत आहे. घरात हा प्रसंग सर्व जणांनी अनुभवला आहे.
३. वार्याने दार बंद होतांना ‘‘तू येथे थांब’’, असे म्हटल्यावर दार तेथेच स्थिर होणे आणि तशीच अनुभूती नातीलाही आल्यावर ‘एवढ्या बाळाचेही देव ऐकतो’, हे लक्षात येऊन स्वतःचा अहंकार न्यून होणे
एकदा वार्याने दार बंद होत असतांना मी दाराला म्हणालो, ‘‘तू येथे थांब.’’ तेव्हा दार तेथेच थांबले. हे देवांशीने पाहिले होते. त्याप्रमाणे जेव्हा दार बंद व्हायचे, तेव्हा चि. देवांशी दाराकडे हात करून ‘थांब…थांब’, असे म्हणायची आणि दार तिथे स्थिर व्हायचे. हे पाहिल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि ‘एवढ्या बाळाचेही देव ऐकतो’, हे लक्षात येऊन माझ्यातील अहंकार देवाने न्यून केला.
‘देवा, तुझा हा साक्षात्कार अखंड अनुभवत आहे, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर (५.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |