शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून कधीच इतिहासाला धक्का लावला नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १०० व्या वर्षांत पदार्पण
पुणे, २९ जुलै – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणातून केवळ सत्य मांडले आहे. त्यांनी दंतकथा सांगितल्या नाहीत. जेव्हा दंतकथा असतील, त्या वेळी ते तसा उल्लेख करत होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी काढले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै या दिवशी १०० व्या वर्षांत पदार्पण केले. सध्या ३ दिवसांच्या पुणे दौर्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांंची भेट घेतली, तसेच त्यांच्या पायावर डोके टेकवत त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी ठाकरे यांनी मनसेच्या वतीने शिवशाहिरांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला, तसेच गुलाबपुष्प देऊन आणि पगडी घालून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी जेव्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटतो, तेव्हा मला एक नवीन ‘खजिना’ मिळतो. शिवछत्रपतींविषयी नवीन माहिती मिळते. मला प्रत्येक वेळी वाटते की, ते शिवचरित्रामधून ‘आजच्या दशकातही आपण कसे रहायला पाहिजे ?’ हे सांगतात. शिवचरित्र अनेकांनी लिहिले; पण ‘समाजाने कसे सावध रहायला हवे ?’ हे केवळ बाबासाहेबांच्या शिवचरित्रात वाचायला मिळते.
बाबासाहेबर पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ आणि इतिहासप्रेमी मंडळ यांच्या वतीने अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात २० बाय १५ फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे, तसेच ९९ दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत.