सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना वेळच दिला नाही ! – प्रशांत बंब, आमदार, भाजप

आमदार प्रशांत बंब

मुंबई – ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारून म्हणजे सरकार स्थापन होऊन पावणे दोन वर्षे झाली असतांनाही त्यांनी एकदाही विरोधी पक्षांतील आमदारांना वेळ दिलेला नाही, तसेच आमदारांनी पाठवलेल्या पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून उत्तरही येत नाही’, अशी तक्रार संभाजीनगर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी कृपया आम्हाला वेळ द्यावा’, अशी विनंती त्यांनी ‘फेसबूक’द्वारे केली आहे.

आमदार प्रशांत बंब हे ‘फेसबूक’वरील ‘व्हिडिओ’मध्ये म्हणाले की, कोरोनाचे संकट असो, राज्यातील विविध विभागांत बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना आणि दुष्काळाचे प्रश्‍न या सर्वांवर विरोधी पक्षातील आमदारांना बोलायचे आहे. यांवर आम्हाला मते मांडायची आहेत. तेव्हा कृपया मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी, तसेच आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.