साधनेतील सर्व भार परात्पर गुरुदेवांवर सोपवल्यावर संसारातील कर्तव्ये व साधना करून घेतल्याविषयी सौ. मीनाक्षी धुमाळ यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने गेली १८ वर्षे ‘पणजी ते रामनाथी’ असा प्रवास करून प्रतिदिन सेवा करत आहे. सेवा करतांना मला यजमान, मुले आणि साधक यांचे पुष्कळ साहाय्य लाभले. त्यांच्यामुळेच मी सेवा करू शकले. सेवा करतांना आलेल्या अडचणी, तसेच सर्व भार देवावरच सोपवल्यामुळे अडचणींमधून मार्ग मिळणे आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने संसारातील सर्व कर्तव्येही पूर्ण करता येणे, हे सर्व कसे शक्य झाले ? ते मी येथे कृतज्ञतापूर्वक मांडत आहे.

सौ. मीनाक्षी धुमाळ

१. साधनेला आरंभ केल्यावर

१ अ. प्रतिदिन प्रवास आणि सेवा करूनही थकवा न जाणवणे : वर्ष २००४ पासून मी ‘पणजी ते फोंडा’ असा प्रवास नियमित करून प्रतिदिन सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.३० या वेळेत सेवेला येते. मी घरी रात्री ८.३० पर्यंत पोचते. त्यानंतर पुढील सेवा आणि घरातील कामे करते, तरीही ‘मी कधी दमले किंवा थकले’, असे झाले नाही. प्रकृती ठीक नाही; म्हणून अडचण येण्याचे प्रमाणही अत्यल्प होते.

१ आ. बसगाडीच्या प्रवासात होणारा उलट्यांचा त्रास नंतर न होणे : आरंभी मला बसने प्रवास करणे शक्य नसायचे. बसने प्रवास करतांना उलटी व्हायची; परंतु मी प्रतिदिन वेगवेगळे उपाय करून जायचे. असे करत करत सहा मासांनंतर माझा त्रास अल्प झाला आणि नंतर तो बंदच झाला.

१ इ. गुरुदेवांच्या कृपेमुळे कृतज्ञतेची जाणीव होणे : कधी मला घरी जायला विलंब झाला, तर यजमान पाव आणि भजी आणायचे अन् आम्ही चौघेजण ते खाऊन झोपायचो. प्रथम मला याविषयी कृतज्ञता वाटत नव्हती. नंतर गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘सर्वजण मला साधनेसाठी साहाय्य करत आहेत’, ही जाणीव झाली.

१ ई. सेवेचे लहान लहान दायित्व मिळाल्याने मायेतील ओढ न्यून होऊन अधिकाधिक वेळ सेवेला देऊ लागणे : प्रथम माझ्याकडे सेवेचे दायित्व नव्हते आणि मला दायित्वाची जाणीवही नसायची. त्यामुळे कधी कधी मी घरी रहायचे आणि प्रत्येक रविवारी सुटी घ्यायचे. मुलांना सुटी लागली की, मी एक ते दीड मास पुण्याला भावाच्या घरी जाऊनही रहायचे. त्यानंतर मला सेवेचे लहान लहान दायित्व मिळाले आणि तेव्हापासून मायेतील ओढ न्यून होऊन मी अधिकाधिक वेळ सेवेला देऊ लागले. मी सुटीत पुण्याला न जाता आश्रमात रहायला जाऊ लागले.

२. मुलांनी साधनेत साहाय्य करणे आणि त्याविषयी देवानेच कृतज्ञतेची जाणीव करून देणे

२ अ. मुले लहान असतांना देवाने शेजार्‍यांच्या माध्यमातून त्यांना सांभाळणे : मुले लहान असतांना आम्ही ताळगाव येथे भाड्याच्या घरी रहायचो. त्या वेळी मुले घरी एकटी असायची. तेव्हा घरमालकीण आणि सत्संगात येणारे साधक श्री. सोमनाथ लोहार यांनी मुलांना सांभाळले. मुलांना कधी आजारपण आले, तर त्या परिस्थितीत देवच त्यांची काळजी घेत होता.

२ आ. मुलांनी जेवणात आवड-निवड न ठेवणे : मुले लहान होती; परंतु त्यांनी कधीही हट्ट केला नाही. ‘मला हेच करून दे, तेच हवे, जेवण गरम करून हवे’, असे त्यांनी कधीही सांगितले नाही. मी इतर साधकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या बोलण्यात यायचे, ‘मुलांना सकाळ-संध्याकाळ वेगळे जेवण लागते, स्वयंपाक गरम करून हवा असतो, प्रतिदिन मुलांना काहीतरी भाजलेले आणि तळलेले पदार्थ लागतात. आम्हाला मुलांचा अभ्यासही घ्यायचा आहे.’ हे सर्व ऐकून मला माझ्या मुलांप्रती कृतज्ञता वाटायची.

२ इ. इयत्ता ५ वीत शिकत असलेल्या मोठ्या मुलाने लहान भावाला सांभाळणे आणि घरकामांतही साहाय्य करणे : मी घरात नसतांना माझा ५ वीत शिकत असलेला मोठा मुलगा लहान मुलाला (भावाला) सांभाळायचा. घरी आला की, तो त्याला जेवण देणे, झोपवणे हे सर्व करायचा. तो शाळेतून ५ वाजता घरी आला की, वाळत घातलेले कपडे घडी करून ठेवायचा. कधी त्याला सांगितले, तर वरण-भाताचा ‘कूकर’ही लावायचा. माझ्या स्वभावदोषांमुळे माझ्या मनात कधी कधी मुलांकडून अपेक्षेचे विचार यायचे. ‘त्यांनी घर व्यवस्थित ठेवावे’, असे वाटायचे; परंतु देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला माझ्या चुकांची जाणीव करून द्यायचा.

२ ई. देवाच्या कृपेने दोन्ही मुलांनी आपापला अभ्यास करून शिक्षण पूर्ण करणे : दोन्ही मुले आपापला अभ्यास करायची. त्यांना कधीच शिकवणी लावावी लागली नाही. मोठा मुलगा १२ वीपर्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. लहान मुलगा थोडा द्वाड (मस्तीखोर) होता. त्याने १० वी नंतर ‘आय्.टी.आय्’ला प्रवेश घेऊन रात्रीच्या महाविद्यालयात जाऊन शिक्षण पूर्ण केले. हे सर्व त्याने स्वतःहून केले. मला कधीही त्यात लक्ष घालावे लागले नाही. मी रात्री उशिरा घरी जायचे, तेव्हा देवच मुलांची काळजी घेत होता.

२ उ. मुलांनीही आश्रमात राहून आनंदाने सेवा करणे : मी मे मासात मुलांना घेऊन आश्रमात जायचे. मोठा मुलगा नेसाई आश्रमात आनंदाने रहायचा आणि सेवा करायचा. लहान मुलगा माझ्या समवेत रामनाथी आश्रमात यायचा. पुढे बांधकाम चालू असतांना तो तेथे लहान लहान सेवा करायचा. प्रतिदिन सकाळी लवकर उठून तो सेवेला जायचा. दिवाळीच्या सणाच्या दिवशी मी घरी गेले; पण तो आश्रमातच राहिला आणि दिवाळी झाल्यावर घरी आला. तो सर्व साधकांशी मिळून मिसळून राहिला.

३. साधनेच्या प्रवासात यजमानांनी केलेले साहाय्य

३ अ. सेवा करून घरी येण्यास विलंब झाला, तर यजमानांनी रात्री फोंड्याला न्यायला येणे : यजमानांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंप्रती आदर आहे. त्या भेटल्या की, यजमानांना चांगले वाटायचे. मी आश्रमात सेवा करत होते; म्हणून यजमानांना कोणतीच काळजी नव्हती. कधी आश्रमात रहायचे म्हटले, तरी ते मला काही म्हणायचे नाहीत. रात्री घरी येण्यास विलंब होणार असेल, तर ते मला फोंड्याला न्यायला यायचे.

३ आ. सणासुदीलाही आश्रमात सेवेला जाण्यास विरोध न करणे : पाऊस असला, कधी सण असला, तरी ‘सेवेला जाऊ नको’, असे यजमानांनी मला म्हटले नाही. सणाच्या दिवशीही मी आश्रमात जायचे. वेळ प्रसंगी ते मला आश्रमात सोडायलाही यायचे. ते मध्ये मध्ये कामावरून घरी येऊन मुलांना पहात असत. मुले किंवा यजमान रुग्णाईत असले, तरी त्यांनी मला सेवेला जाण्यास अडवले नाही.

४. मुलांवर चांगले संस्कार करतांना ‘त्यांनी साधना करणे किंवा न करणे’, हे त्यांच्या प्रारब्धावर सोडणे

यजमान कधी तरी मला म्हणायचे, ‘‘मुलांना वेळ द्यायला पाहिजे.’’ तेव्हा मी त्यांना म्हणायचे, ‘‘त्यांच्या प्रारब्धानुसार आहे, ते होईल. मी वेळ दिला; म्हणून काही पालटणार नाही. घडायचे ते घडणारच आहे. आपण त्यांच्यावर केवळ चांगले संस्कार करूया.’’ मुले लहान असतांना आश्रमात यायची. त्यामुळे देवानेच त्यांच्या मनात साधनेचे बीज पेरले. ‘मुलांनी साधना करणे किंवा न करणे’, हे मी त्यांच्या भाग्यावर सोडले होते. त्यामुळे मला यजमान किंवा मुले यांच्याविषयी काही वाटायचे नाही. मी कर्तव्य म्हणूनच सर्व करत होते.

५. गुरुदेवांच्या कृपेने कुटुंबियांच्या मनातील ‘आता घरी राहून सेवा कर’, हा विचार जाऊन त्यांनी साधनेत साहाय्य करणे

मध्यंतरी एक प्रसंग घडला. तेव्हा यजमान आणि मुले सांगू लागले, ‘‘तू आता घरी राहून सेवा कर.’’ तेव्हा सर्वांना मी एकदाच उत्तर दिले, ‘‘मला साधना करायची आहे. कोणतेही प्रसंग आले, तरी मी साधना सोडणार नाही.’’ त्यांना ते पटले आणि त्यानंतर त्यांनी परत विषय काढला नाही. गुरुदेवांनीच त्यांना बुद्धी दिली. त्यानंतर त्यांनी मला सतत साहाय्यच केले.

६. नातेवाइकांनी साधनेत केलेले साहाय्य

६ अ. नातेवाइकांनी ‘घरी रहा’, असे न सांगणे : कधी पुण्याहून भाऊ किंवा बहीण घरी आले, तर तेसुद्धा मला साहाय्य करायचे. त्यांना घरी ठेवून मी आश्रमात सेवेला यायचे, तर कधी त्यांनाही आश्रमात घेऊन जायचे. त्यांना सर्व ठाऊक झाल्यावर त्यांनी मला ‘घरी रहा’, असे कधीच सांगितले नाही.

६ आ. मुलाच्या लग्नाच्या वेळी साधक आणि नातेवाईक यांनी साहाय्य केल्यामुळे लग्नाची सर्व सिद्धता सहजतेने होऊन सेवाही वेळेत पूर्ण होणे : माझ्या मुलाचे लग्न ठरल्यावर इतर साधक आणि समाजातील लोक यांचे सोहळे पाहिले की, मला वाटायचे, ‘मला एवढा वेळ द्यायला जमणार नाही.’ त्यामुळे मी ‘देवा, कसे करायचे, ते तूच मला सांग. तूच माझ्याकडून अल्प वेळेत सर्व करवून घे’, अशी प्रार्थना करायचे. देवाने मला भाऊ, बहीण आणि साधक यांच्या माध्यमांतून सर्व साहाय्य केले. त्यामुळे लग्नासारख्या गोष्टीही १५ दिवसांत पूर्ण झाल्या. काही साधकांनी पत्रिका बनवून दिली. खरेदीसाठी मी पुण्याला गेले, तरी तिथेही सेवा करत होते. पुण्याला २ दिवस गेल्यावर तेथे भाऊ, बहीण आणि वहिनी यांनी पुष्कळ साहाय्य केले अन् मला साधनेसाठी वेळ दिला. तेव्हा ‘हे सर्व इतरांच्या साहाय्यामुळेच होत आहे’, याची मला जाणीव असायची. ‘गुरुपौर्णिमेची जशी सिद्धता करतो’, तसेच मला वाटत होते. त्यामुळे ‘मी सेवेतून बाहेर आहे’, असे मला वाटतच नव्हते.
कधी संतांची भेट झाली, तर ते मला यजमानांविषयी विचारायचे आणि म्हणायचे, ‘‘बरे आहे ! ते तुम्हाला काही विरोध करत नाहीत.’’ त्यांच्या त्या बोलण्यातूनच मला घरातल्यांविषयी कृतज्ञता वाटू लागली.

७. अनुभूती

७ अ. यजमानांचा अपघात झाला असता एका अनोळखी व्यक्तीने सर्व साहाय्य करणे आणि साधनेत आल्यावर ‘ती व्यक्ती प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारखी दिसत होती’, हे लक्षात येऊन श्रद्धा बळकट होणे : मी साधनेत येण्यापूर्वी यजमानांचा त्यांच्या आस्थापनात लहानसा अपघात झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्या वेळी मला काही ठाऊक नसल्याने मी केवळ रडत होते. मी त्यांना घेऊन रांगेत बसले होते. तेव्हा एक व्यक्ती तिथे आली आणि तिने आम्हाला थेट डॉक्टरांकडे नेले. तिने आम्हाला यजमानांना रुग्णालयात भरती करून घेण्याच्या प्रक्रियेत पुष्कळ साहाय्य केले. मला तिचा पुष्कळ आधार वाटला. तिथे माझ्या जवळचे कुणीच नव्हते. त्या व्यक्तीने सर्व साहाय्य केले आणि नंतर ती निघून गेली. नंतर मी त्या व्यक्तीला पुष्कळ शोधले; पण ती मला सापडली नाही. मी साधनेत आल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहिले. तेव्हा मला कळले की, ती व्यक्ती काहीशी तशीच दिसत होती. त्या वेळी देवानेच माझी श्रद्धा बळकट केली. तेव्हा ‘प.पू. भक्तराज महाराज हेच माझे सर्वस्व आहेत’, हे मला कळले.

– सौ. मीनाक्षी धुमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१३.१२.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक