पुणे-शिरूर रस्त्यावरील दुमजली पुलासाठी ७ सहस्र २०० कोटी रुपयांची मान्यता !

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम रखडल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यायला हवी. नाहीतर आगीतून फुफाट्यात अशीच नागरिकांची अवस्था होईल.

शिरूर – गेल्या अनेक वर्षांपासून नगर रस्ता वाहतूक कोंडीचा सामना करत आहे. ही वाहतूक कोंडी काही अंशी अल्प करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुणे-शिरूर या ६७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील दुमजली पुलाच्या ‘एलिव्हेटेड कॅरिडॉर’साठी ७ सहस्त्र २०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. पुणे-शिरूर रस्त्याच्या कामासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत होता; मात्र भूसंपादन करण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन दुमजली पुलासह १८ पदरी रस्ता करण्याचा पर्याय निवडण्यात आला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सूचनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. पुणे-शिरूर रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर्) बनवण्यासाठी २० कोटी रुपये संमत केले आहेत. २८ जुलै या दिवशी सल्लागार नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया चालू होणार असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.