पूरग्रस्त भागात केंद्राच्या निधीतून कामे करावीत ! – खासदार श्रीनिवास पाटील
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा. जिल्ह्यातील पूरग्रस्त, भूस्खलन झालेल्या भागांतील रस्ते आणि पुलांची कामे तात्काळ होणे आवश्यक आहे. ही कामे केंद्रीय रस्ते निधीतून करावीत, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकसभा अधिवेशनासाठी देहली येथे असलेले पाटील २ दिवसांसाठी सातारा जिल्हा दौर्यावर आले. त्यांनी महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण, कराड आदी तालुक्यांतील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पहाणी दौरा केला. पुन्हा देहली येथे पोचताच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पूरस्थितीची माहिती दिली.
पाटील यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी पुलांची उंची अल्प असल्यामुळे पावसाळ्यात अनेक गावे संपर्कहीन होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन रस्ते आणि नवीन पूल यांची निर्मिती करावी लागणार आहे. जेणेकरून भविष्यात अतीवृष्टीमध्येही वाहतूक व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.