फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे सतारवादक साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या सतारवादनाच्या कार्यक्रमाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘१०.७.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने फोंडा, गोवा येथील सतारवादक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या सतारवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि असणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यात आला. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्री. मनोज सहस्रबुद्धे

१. रात्री ११ ते रात्री ३ या कालावधीत झालेल्या सतारवादनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भातील सूत्रे

१ अ. सतारवादन ऐकण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि सतारवादन ऐकतांना आलेल्या अनुभूती

१ अ १. विविध त्रास होणे : कार्यक्रमाला येण्यापूर्वी माझ्या डोक्यावर आणि घशावर दाब जाणवत होता अन् मला निरुत्साह वाटत होता.

१ अ २. सतारवादनामुळे मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन माझ्या मनाची एकाग्रता वाढणे : कार्यक्रमाला आरंभ झाल्यावर सतारीचा सुमधूर नाद ऐकल्यावर माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन माझ्या मनाची एकाग्रता वाढली.

१ अ ३. देहाभोवती साठलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन सतारवादनातून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍या शुभ्र रंगाच्या नादलहरी देहात प्रविष्ट होणे : पहिली १५ मिनिटे सतारवादन ऐकतांना माझ्या देहाभोवती साठलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले आणि सतारवादनातून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍याशुभ्र रंगाच्या नादलहरी माझ्या देहात प्रविष्ट झाल्या. त्यामुळे माझ्या पेशीपेशी श्वेत प्रकाशाने न्हाऊन निघाल्या.

कु. मधुरा भोसले

१ अ ४. डोक्यावरील दाब न्यून होणे : थोड्या वेळानंतर या सतारीतून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींनी माझ्या डोक्यामध्ये प्रवेश केला. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये मला हालचाल झाल्याचे जाणवले आणि माझ्या डोक्यावरील दाब डोक्याच्या डाव्या बाजूला खेचला गेला अन् तो न्यून झाला.

१ आ. श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी केलेल्या सतारवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि झालेले सूक्ष्म परीक्षण

१ आ १. दोन सुरांमध्ये अंतर असल्याने वातावरणात निर्गुण नादलहरी कार्यरत होणे : सतारवादन सलग चालू असतांना दोन सुरांमध्ये अंतर होते. तेव्हा मला वातावरणात निर्गुण नादलहरी कार्यरत झाल्याचे जाणवले.

१ आ २. श्री. सहस्रबुद्धे यांच्यावरील सरस्वतीदेवीच्या कृपेमुळे त्यांना उत्कृष्ट सतारवादन सादर करता येणे : श्री. सहस्रबुद्धे यांच्या मस्तकावर माता सरस्वतीदेवीचा कृपेचा हात असल्याचे दिसले. त्यामुळे अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून विरोध केला, तरी त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम न होता त्यांना उत्कृष्ट सतारवादन सादर करता आले.

१ आ ३. सतारीच्या चढत गेलेल्या नादातून वातावरणात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होणे : सतारीचा नाद जसजसा चढत गेला (उच्च पट्टीत चालू झाला), तसतसा नादलहरींतून अत्युच्च पातळीच्या चैतन्याच्या लहरी निर्माण होऊन त्या वातावरणात प्रक्षेपित झाल्या आणि त्यांतून सर्वत्र सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित झाली.

१ आ ४. सतारीवर राग यमन वाजवल्याने मनाचा त्रास, ताण अन् नकारात्मकता न्यून होणे : सतारीवर राग यमन वाजवण्यात आला, तेव्हा सतारीच्या सात्त्विक नादाचा मनातील त्रासदायक आणि नकारात्मक विचारांवर आघात होऊन मनाचा त्रास, ताण अन् नकारात्मकता न्यून झाली. त्यामुळे मला माझ्या डोक्यावर जाणवणारा जडपणा न्यून होऊन हलके वाटू लागले.

१ आ ५. सतारीच्या संथ, मध्यम आणि जलद गतीने प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींसह अनुक्रमे पांढर्‍या, पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या प्रकाशलहरी वातावरणात प्रक्षेपित होणे : सतारीच्या संथ, मध्यम आणि जलद गतीने प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींसह अनुक्रमे प्रथम पांढर्‍या, नंतर पिवळ्या आणि शेवटी गुलाबी रंगाच्या प्रकाशलहरी वातावरणात प्रक्षेपित झाल्या. तेव्हा अनुक्रमे शांती, चैतन्य आणि आनंद यांच्या अनुभूती आल्या.

१ आ ६. सतारवादन करणारे श्री. सहस्रबुद्धे गाढ ध्यानावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर आजूबाजूच्या व्यक्ती अन् परिस्थिती यांचा तीळमात्रही परिणाम न होणे : सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे त्रास देणे चालू होते. तरीही श्री. सहस्रबुद्धे मांडी घालून शांतपणे सतारवादन करत होते. त्यांच्यावर असणार्‍या श्रीसरस्वतीदेवीच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्याकडून सतारवादन करतांना संगीताची उपासना होऊन त्यांचे ईश्वराशी अनुसंधान निर्माण झाले होते. त्यामुळे ते गाढ ध्यानावस्थेत गेले होते आणि त्यांच्यावर आजूबाजूच्या व्यक्ती अन् परिस्थिती यांचा तीळमात्रही परिणाम झाला नाही.

 श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी केलेल्या सतारवादनाचे ध्वनीमुद्रण उत्तररात्री ३ ते पहाटे ४.३० या कालावधीत ऐकवण्यात येणे

२ अ. सूक्ष्मातून दैवी सतारीचे दर्शन होणे : ‘व्यासपिठापासून ५ – ६ फूट उंचीवर पांढर्‍या रंगाची दैवी सतार हवेत तरंगत आहे आणि तिच्या तारा छेडल्या जाऊन त्यांतून मधुर नाद ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. सतारवादनामुळे साधकांची सप्तचक्रे आणि नवद्वार यांमध्ये साठलेली त्रासदायक शक्ती विघटित झाल्याने शरीर हलके वाटणे : कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या साधकांची सप्तचक्रे आणि नवद्वार यांमध्ये साठलेली त्रासदायक शक्ती बाहेर खेचली जाऊन ती विघटित झाली. त्यामुळे साधकांना त्यांचे शरीर हलके झाल्याचे जाणवले.

२ इ. पांढर्‍या शुभ्र वस्त्रातील एका देवीचे दर्शन होऊन तिने सर्वांना आशीर्वाद देणे : मला पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेल्या एका देवीचे दर्शन झाले. तिने प्रसन्न होऊन प्रथम श्री. सहस्रबुद्धे आणि नंतर कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या साधकांना आशीर्वाद दिला.

२ ई. सतारीच्या मंद लयीवर व्यासपिठाच्या ठिकाणी निळसर पांढर्‍या रंगाची आकाशगंगा संथ गतीने फिरतांना दिसणे : ‘सतारीच्या मंद लयीवर व्यासपिठाच्या ठिकाणी निळसर पांढर्‍या रंगाची आकाशगंगा संथ गतीने फिरत आहे’, असे दृश्य दिसले. यावरून ‘सतारीचा सूक्ष्म नाद ब्रह्मांडात कार्यरत आहे’, असे जाणवले. यावरून ‘आकाशतत्त्वावर आधारित असणार्‍या संगीताची व्याप्ती संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत आहे’, असे जाणवले.

३. सतारवादनाविषयी जाणवलेली सामायिक सूत्रे

३ अ. सतारीविषयी जाणवलेली सूत्रे

३ अ १. शास्त्रीय गायनापेक्षा सतारवादनामुळे अधिक प्रमाणात उपाय होणे : सतारवादनामध्ये शब्दरूपी घनता नसून नादरूपी सूक्ष्मता असल्याने ‘शास्त्रीय गायनापेक्षा सतारवादनामुळे अधिक प्रमाणात उपाय होतात’, असे जाणवले.

३ इ. श्री. सहस्रबुद्धे यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

३ इ १. श्री. सहस्रबुद्धे यांचे ईश्वराशी अनुसंधान वाढल्यावर त्यांच्या सतारवादनातून आध्यात्मिक स्तरावरील उपाय होण्याचे प्रमाण वाढणे : श्री. सहस्रबुद्धे यांचे ईश्वराशी अनुसंधान वाढल्यावर त्यांच्या सतारवादनातून आध्यात्मिक स्तरावरील उपाय होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचाही त्रास वाढला.

३ इ २. श्री. सहस्रबुद्धे यांचे ईश्वराशी अनुसंधान वाढल्यावर सतारीचा नाद आधीपेक्षा पुष्कळ मधुर आणि सजीव झाल्याचे जाणवणे : श्री. सहस्रबुद्धे यांचे ईश्वराशी अनुसंधान वाढल्यावर सतारीचा नाद आधीपेक्षा पुष्कळ मधुर आणि सजीव झाल्याचे जाणवले. ‘संगीताची परिणामकारकता वाढवण्यासाठी ईश्वराशी अनुसंधान असणे किती आवश्यक आहे’, हे सूत्र या ठिकाणी अधोरेखित झाले.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०१८ रात्री १२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक