साधिकेची आई कोरोनामुळे रुग्णाईत असतांना आणि तिच्या निधनानंतर साधिकेला आलेले कटू अनुभव !
१. औषधांचा चालणारा काळाबाजार !
‘माझ्या आईला कोरोना झाल्याने तिला रुग्णालयात भरती केले होते. तिची प्रकृती खालावत चालली होती; म्हणून माझ्या ताईने आईला भेटण्यासाठी मला आणि बाबांना रुग्णालयात नेले. तेव्हा आईच्या अंगावर पुष्कळ सूज होती. त्या दिवशी आम्ही आईसाठी ‘तोसिलिझुमाब’ (कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध) हे ‘इंजेक्शन’ शोधत होतो. आईची प्रकृती फारच खालावल्यामुळे तिला ते ‘इंजेक्शन’ देणे आवश्यक होते. ४० सहस्र रुपये मूल्य असलेले ते ‘इंजेक्शन’ ताईला ६० सहस्र रुपयांना मिळाले होते; पण ‘इंजेक्शन’ विकणार्या व्यक्तीला ८० सहस्र रुपये देणारी दुसरी व्यक्ती भेटल्यामुळे तिने ते ‘इंजेक्शन’ दुसर्या व्यक्तीला विकले. त्यानंतर आम्ही रुग्णालयात पोचलो, तेव्हा आईचे निधन झाले होते.
२. आईच्या निधनानंतर तिच्या दागिन्यांची चोरी होणे आणि ते शोधण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी अन् पोलीस यंत्रणा यांच्याकडून कोणतेही साहाय्य न मिळणे
आईच्या निधनानंतर रुग्णालयातील कर्मचार्यांपैकी कुणीतरी तिचे मंगळसूत्र आणि कानातले काढून घेतले होते. तिचे मंगळसूत्र विधींसाठी लागणार होते. आम्ही तेथील आधुनिक वैद्यांना विनवणी केली, ‘‘मंगळसूत्र कुणी चोरले आहे ?’, हे सांगू नका. केवळ तुम्ही आम्हाला मंगळसूत्र आणून द्या’’; पण मंगळसूत्र परत मिळाले नाही. आम्ही ‘सी.सी.टी.व्ही. फूटेज’ (इमारतीत येणार्या-जाणार्या लोकांचे सुरक्षेच्या दृष्टीने अखंड चित्रीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी छायाचित्रक (कॅमेरे) बसवलेले असतात. त्यांद्वारे करण्यात येणार्या चित्रीकरणाला ‘सी.सी.टी.व्ही. फूटेज’ असे म्हणतात.) मागितल्यावर ‘आमच्या संगणकाची ‘हार्ड डिस्क’ (संगणकीय सुरक्षा साठा घेणारे साधन) खराब आहे’, असे रुग्णालयातील कर्मचार्यांनी आम्हाला सांगितले. (यालाच मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे असा प्रकार म्हणतात. – संपादक) या प्रसंगात आम्हाला पोलीस यंत्रणेकडूनही कोणतेच साहाय्य मिळाले नाही.
३. साधिकेने ‘फेसबूक’वर अशा प्रकरणांमध्ये साहाय्य करणार्या एका संघटनेचे चलचित्र पहाणे, तिच्या कुटुंबियांनी त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटणे, निवडणुका आल्याने त्यांनी केवळ साहाय्य करण्याचा दिखावा करून प्रत्यक्षात कोणतेही साहाय्य न करणे
मी ‘फेसबूक’वर अशा प्रकरणांमध्ये लोकांचे साहाय्य करणार्या एका संघटनेचे चलचित्र (व्हिडिओ) पाहिले होते. आम्ही त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘आपण रुग्णालयासमोर चित्रीकरण करूया. जे काही घडले आहे, ते सर्व सांगण्याची तुमची सिद्धता आहे का ?’’ त्या वेळी आम्ही त्यांना ‘हो’ म्हणालो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘पुढे पोलीस कारवाई झाली किंवा काहीही झाले, तर त्याला आम्ही उत्तरदायी असणार नाही. आम्ही तुम्हाला पुढे कोणतेही साहाय्य करणार नाही. आम्ही या प्रकरणातून बाहेर पडणार. पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.’’
तेव्हा निवडणूक जवळ आली होती; म्हणून ही संघटना केवळ दिखाऊपणा करत होती. ‘फेसबूक’वर चलचित्र पाहिल्यावर मला वाटले होते, ‘हे लोक किती साहाय्य करतात ! आम्हालाही साहाय्य करतील’; पण त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले, ‘सर्व जण केवळ स्वार्थ बघतात.’ चलचित्रामध्ये ‘त्यांनी साहाय्य केले’, असे सर्व लोकांना दिसते; पण प्रत्यक्षात तसे काहीही नसते.’ – एक साधिका