कोरोनाच्या आजारपणात साधकाने अनुभवलेली अखंड गुरुकृपा !

१. कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यावर एक क्षण भीती वाटणे आणि ‘गुरुच यातून बाहेर काढतील’, असा विचार करून नामजप आणि प्रार्थना यांकडे लक्ष केंद्रित करणे अन् रुग्णालयात भरती होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘१५.२.२०२१ या दिवशी मला १०१º फॅरनहाईट ताप होता आणि मला श्वास घेण्यासही त्रास होत होता. माझी कोरोनाविषयक चाचणी झाल्यावर मला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक वैद्यांनी मला हे सांगताच एक क्षण भीती वाटली. त्यानंतर ‘आता गुरुच मला यातून बाहेर काढतील. मी वाचलो, तर मला गुरुचरणी सेवा करण्याचे भाग्य लाभेल आणि माझा मृत्यू झाल्यास सूक्ष्मातून गुरूंच्या समवेत रहाण्याचे सौभाग्य मिळेल’, असा विचार करून मी नामजप अन् प्रार्थना यांकडे लक्ष केंद्रित केले. रात्री १०.३० वाजता मला एका सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. थोड्या वेळाने माझा ताप वाढला आणि मला श्वास घेण्यासही जास्त त्रास होऊ लागला. मला जेवणही जात नव्हते. मी गुरूंचे नामस्मरण करत तसाच झोपलो. थोड्या वेळाने माझे दोन्ही त्रास न्यून झाले.

२. एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात भरती करणे

दुसर्‍या दिवशी मला त्या रुग्णालयातून अन्य रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णवाहिकेतून जातांना मला नाकाला प्राणवायूची (ऑक्सिजनची) नळी लावली होती. त्या वेळी माझी अवस्था फारच वाईट होती. मला प्राणवायूचा  पुरवठा नीट होत नसल्याने मला श्वासोच्छ्वास करणे कठीण जात होते.

३. एका रुग्णालयात अनुभवलेली गुरुकृपा

३ अ. ‘अन्य साधकाच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव काळजी घेत आहेत’, असा विचार येणे : मी अन्य एका रुग्णालयात गेल्यावर मी पलंगावर झोपून होतो. काही वेळाने माझ्या ‘वॉर्ड’मध्ये मला एका साधकाच्या आईला भरती केल्याचे दिसले. त्या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरुदेव येथेही मला साधकांचा सत्संग मिळवून देत आहेत’, असा विचार आला. तेथे मला जेवण आणून द्यायला कुणी नव्हते आणि ‘स्वतः जाऊन जेवण घेऊन यावे’, अशी माझी स्थिती नव्हती. त्या वेळी त्या साधकाने मला दुपारचे जेवण आणून दिले. ‘परात्पर गुरुदेव माझी किती काळजी घेत आहेत’, असा विचार करून त्या दिवसापासून ‘मी केवळ अनुभूतींनीच बरा होणार’, असा विचार करून निश्चिंत झालो.

३ आ. एका रुग्णाचा मृत्यू झाल्यावर ताण येऊन मनात नकारात्मक विचार येणे आणि परात्पर गुरूंच्या चरणी प्रार्थना केल्यावर परिस्थिती स्वीकारली जाऊन ताण न येणे : त्याच दिवशी सायंकाळी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या वेळी त्याचे नातेवाइक मोठ्याने रडू लागले. त्यांच्या रडण्यामुळे मला ताण आला. माझ्या समवेत कुणीच नसल्याने माझा ताण आणखी वाढला. ‘आता माझाही मृत्यू होईल. आता मी गुरु आणि साधक यांना बघू शकणार नाही’, या विचाराने माझे मन अस्वस्थ होऊ लागले. त्या वेळी मी परात्पर गुरूंच्या चरणी प्रार्थना केली. त्यानंतर नातेवाइकांच्या रडण्याचा भाग चालू असूनही मला ताण आला नाही.

३ इ. परिचारिका पोटावर इंजेक्शन देत असतांना वेदना होणे आणि ‘गुरूंचे चरणतीर्थ पोटात जात आहे’, असा भाव ठेवल्यापासून इंजेक्शन घेतांना वेदना न होणे : मला प्रतिदिन ५ ते ७ वेळा ‘इंजेक्शन’ दिले जायचे. पहिले २ दिवस मला इंजेक्शन घेण्याच्या जागी दुखत होते. त्यातही पोटावर इंजेक्शन घेतांना मला पुष्कळ वेदना व्हायच्या. तिसर्‍या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेली एका साधकाची अनुभूती वाचली. त्यांनी इंजेक्शन घेतांना ‘गुरुचरणांचे तीर्थ’ घेत असल्याचा भाव ठेवला होता. ते वाचून माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. तेव्हापासून इंजेक्शन घेतांना मी तसाच भाव ठेवत असल्याने मला वेदना होत नव्हत्या. मी प्रतिदिन ‘माझ्या पोटात तीर्थ कधी घालणार ?’, अशी वाट पहात असे. मला हे केवळ गुरुकृपेने साध्य झाले.

३ ई. शरिरातील पांढर्‍या रक्तपेशींची संख्या आवश्यकतेपेक्षा वाढल्यावर औषधोपचार करूनही त्यांची संख्या न्यून न होणे; मात्र एका संतांनी सांगितलेला नामजप केल्यावर पांढर्‍या रक्तपेशींची संख्या न्यून होणे : माझ्या शरिरातील पांढर्‍या पेशींची संख्या २१ सहस्र झाली होती. (सामान्य व्यक्तीच्या शरिरातील पांढर्‍या पेशींची संख्या ४ सहस्र ते ११ सहस्रपर्यंत असते.) आधुनिक वैद्य वेगवेगळी औषधे देत असूनही ही संख्या न्यून होत नव्हती. तेव्हा माझ्या समवेत असलेल्या साधकांनी सांगितले, ‘‘एकदा संतांना नामजप विचारून घेतल्यास बरे होईल.’’ त्या वेळी मी संतांना नामजप विचारून त्याच दिवशी, म्हणजे २६.२.२०२१ या दिवशी पहाटे ३ वाजेपर्यंत प्रयत्नपूर्वक नामजप केल्यावर माझ्या शरिरातील पांढर्‍या पेशींची संख्या १६ सहस्रपर्यंत खाली आली. हे केवळ गुरु आणि संत यांच्या संकल्पानेच साध्य झाले.

३ उ. गुरुकृपेने साधकांचा ‘प्लाझ्मा’ मिळणे आणि ‘साधनेचे चैतन्य असलेला प्लाझ्मा परात्पर गुरुदेव देत आहेत’, असे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे : आधुनिक वैद्य मला २ वेळा ‘प्लाझ्मा’ देणार होते; परंतु माझ्या रक्तगटाशी जुळणारा ‘प्लाझ्मा’ मिळत नव्हता. नंतर गुरुकृपेने एका साधकाचा ‘प्लाझ्मा’ मिळाला. तेव्हा ‘साधक करत असलेल्या साधनेचे चैतन्य असलेला ‘प्लाझ्मा’ मला परात्पर गुरुदेव देत आहेत’, असे मला वाटले आणि माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

४. रुग्ण साधकाला सर्वतोपरी आधार देणारे सहसाधक !

४ अ. साधकाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर केलेले साहाय्य : १६.२.२०२१ या दिवशी एक साधक मला पहायला रुग्णालयात आले होते. त्यांच्या तोंडवळ्यावर सहजता होती. ते माझ्या समवेत १२ दिवस शांतपणे राहिले. माझ्या तोंडाला रुची नसल्यास ते मला रुचकर अल्पाहार आणून द्यायचे. त्यांनी मला शारीरिक, मानसिक यांसह साधनेचे विचार सांगून आध्यात्मिक स्तरावरही साहाय्य केले. त्यांच्यात आत्मीयता आणि प्रीती आहे. रुग्णालयात प्रसंग घडल्यास ते माझे धैर्य वाढवून मला सकारात्मक रहायला सांगायचे. त्यांनी मला ‘भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी प्रेमाने सांगितले. त्यामुळे मला पुष्कळ आधार वाटला आणि रुग्णालयात रहाणे शक्य झाले.

४ आ. सहसाधकाने आधुनिक वैद्य देत असलेली औषधे पहाणे आणि ‘औषध देतांना चूक होणार नाही’, याविषयी दक्षता घेणे : दोन प्रसंगांत आधुनिक वैद्यांकडून मला अयोग्य औषधे दिली जात होती. साधकांनी ‘हे लक्षात घेऊन त्यांना विचारून तसे होऊ नये’, याकडे लक्ष दिले. हा त्यांच्या जीवनातील पहिलाच अनुभव असूनही त्यांनी जागरूकतेने आणि दक्षतेने सर्व पाहिले. आधुनिक वैद्यांनी ‘माझ्या शरिरात पाण्याचे प्रमाण न्यून आहे’, असे सांगताच ते मला विविध विचार सांगत पाणी किंवा फळांचा रस प्यायला द्यायचे.

४ इ. सहसाधक वयाने लहान असूनही त्याने मोठ्या भावासारखा आधार दिल्याने आत्मविश्वास निर्माण होणे : आरंभी मला पुष्कळ ग्लानी येत असल्याने मी ५ – ६ दिवस अंथरुणावर झोपूनच होतो. त्यामुळे माझ्या पायात शक्ती नसल्यासारखे झाले. त्या वेळी मला शौचालयात जायचे असल्यास ते साधक मला हाताने धरून न्यायचे. मी शौचालयात जाऊन आल्यावर तेच पाणी ओतून शौचालय स्वच्छ करत होते. दादांनी असे ३ – ४ दिवस मला साहाय्य केले. नंतर ते मला म्हणाले, ‘‘दादा, तुम्ही ‘परात्पर गुरुदेवांचा हात धरून जात आहात’, असा भाव ठेवा आणि एकटे जायचा प्रयत्न करा.’’ त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्यामुळे माझ्यात एकट्याने चालत जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. नंतर २ – ३ दिवसांतच खाणे, जेवण आणणे आणि शौचालयात जाणे, या कृती मी एकट्याने करू शकलो. साधक माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही त्यांनी मला मोठ्या भावासारखा आधार दिला.

‘हे गुरुदेव, तुम्ही मला अशा साधकांच्या सहवासात ठेवल्यामुळे तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– एक साधक (१७.३.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक