६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाकातून पृथ्वीवर जन्माला आलेला संभाजीनगर येथील चि. श्रीहरि बळीराम गायकवाड (वय २ वर्षे)
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीहरि बळीराम गायकवाड एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
आषाढी एकादशी (१ जुलै २०२०) या दिवशी महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला संभाजीनगर येथील बालसाधक चि. श्रीहरि गायकवाड (वय २ वर्षे) याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
१ अ. यजमानांनी ‘गुरुदेवांवर विश्वास ठेवून नामजप कर’, असे सांगणे : ‘पहिली मुलगी कु. अनुश्रीच्या प्रसुतीच्या वेळी मला पुष्कळ त्रास झाला होता. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी अधिकची काळजी घ्यायला सांगितली होती. त्यामुळे घरच्यांना आणि मला पुष्कळ काळजी वाटत होती. यजमानांनी मला सांगितले, ‘‘सर्वकाही चांगले होईल. तू गुरुदेवांवर विश्वास ठेव आणि त्यांच्यावर सर्व सोपवून केवळ नामजप कर.’’ मला वेळ मिळेल, तेव्हा मी दिवस-रात्र नामजप करत असे. श्रीकृष्ण, दुर्गादेवी आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप लिहून करत असे. महाशिवरात्रीला महादेवाचा नामजप केल्यावर मी आत्मिक आनंद अनुभवला.
१ आ. ‘सोनोग्राफी’ केल्यावर ‘बाळाची वाढ आणि आरोग्य उत्तम आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
१ इ. सद्गुरु जाधवकाका यांचे मार्गदर्शन लाभणे : अक्षय्य तृतीयेला सेवाकेंद्रात गेल्यावर सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचे ‘अक्षय्य तृतीयेचे महत्त्व आणि साधना’ या विषयावर मार्गदर्शन लाभले. सद्गुरु काकांनी विचारले, ‘‘नामजप करता का ? कोणता करता ?’’ मी ‘नामजप करते आणि लिहितेही’, असे सांगितल्यावर सद्गुरु काकांनी ‘छान आहे’, असे म्हटले आणि आशीर्वाद दिला.
– सौ. सोनी बळीराम गायकवाड (आई)
१ उ. पहाटे अडीच वाजता पंढरपूरच्या आषाढी महापूजेचे प्रसारण आणि संपूर्ण पूजा पाहिली. त्या वेळी ‘जणू बाळही ते पहाण्यास उत्सुक होते’, असे जाणवले.
१ ऊ. गुरुदेवांनी स्वप्नात येऊन ‘सर्व व्यवस्थित होईल’, असे सांगणे : मी ४ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) रामनाथी आश्रमात गेले होतो. तेथे संतांची भावभेट झाली. त्या दिवशी मला स्वप्न पडले की, ‘मी गुरुदेवांच्या चरणांशी माझी चिंता व्यक्त करत आहे आणि गुरुदेव मला सांगत आहेत, ‘सर्वकाही व्यवस्थित होईल.’ त्या वेळी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
– श्री. बळीराम गायकवाड (वडील)
२. जन्मानंतर – जन्म ते ६ मास
अ. आषाढी एकादशीला बाळाचा जन्म होणे : सासूबाई चार वर्षांपूर्वी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेल्या होत्या. सासूबाईंनी त्या वर्षी सगळ्या एकादशीचे उपवास केले होते. त्याचे फळ कि काय म्हणून ‘एकादशीलाच पांडुरंग चि. श्रीहरीच्या रूपात जन्माला आला’, असे वाटले.
आ. श्रीहरि जन्मापासूनच पुष्कळ चंचल आणि हुशार आहे. झोपेत दोन्ही हात जोडून ते डोक्याला लावून नमस्काराच्या मुद्रेत झोपतो, असे दोन-तीन वेळा जाणवले.
इ. तो देवघरातील छोट्या घंटीसमवेत खेळतो.
ई. तो रडत असल्यास त्याला देवघरात नेल्यावर देवतांची चित्रे (फोटो) दाखवली की, तो शांत होतो.
उ. तो मोरपीस श्रीकृष्णाच्या चित्राला लावण्याचा प्रयत्न करतो आणि श्रीकृष्णाशी बोलतो. श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे केले की, तो आनंदी असतो.
ऊ. सद्गुरूंची आरती करतांना आनंद होणे : ‘ज्योत से ज्योत जगावो’ ही सद्गुरूंची आरती लावल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो. ‘आरती कर’, असे म्हटले की, तो लगेच टाळ्या वाजवायला आरंभ करतो. आरती म्हणतांना तो आनंदाने टाळ्या वाजवतो.
३. ६ ते ९ मास
अ. तो गुरुमाऊलीच्या ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाच्या समवेत खेळतो आणि तो उघडून बघतो.
आ. मंदिरात गेल्यावर तो देवाकडे बोट दाखवून ओरडतो. जणूकाही तो सांगत आहे, ‘मला घंटी वाजवू द्या, उदबत्ती ओवाळू द्या.’
इ. मंदिरात गेल्यावर हनुमंताच्या मूर्तीकडे पाहून बोलण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही हात जोडून ‘जय श्रीराम’ म्हणतो.
ई. प्रतिदिन तो ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकतच झोपतो.
उ. श्रीकृष्णाच्या चित्रावरील फूल खाली पडले, तर तो ते श्रीकृष्णाच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.
ऊ. बिस्कीट खात असतांना त्याला सांगितले की, ‘देवाला दे’, तर तो श्रीकृष्णाच्या चित्राजवळ नेऊन ‘खा’, असे म्हणतो.
४. ९ ते १२ मास
अ. सत्संग चालू असल्यास तो पुष्कळ एकाग्रतेने ऐकतो. सत्संगात कोणी बोलत असल्यास तोही प्रतिसाद देतो.
आ. दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका चालू असतांना तो ती लक्षपूर्वक बघत असतो.
इ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये एका छायाचित्रात गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ होत्या. त्या वेळी त्याने त्या छायाचित्रावर डोके ठेवून नमस्कार केला.
परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने त्याचा जन्म आषाढी एकादशीला झाला आणि त्याचे नावही साधिका कु. प्रियांका लोणे हिने श्रीहरि ठेवण्यास सांगितले. गुरुमाऊलीच्या कृपेमुळे श्रीहरीच्या रूपाने प्रसाद आम्हाला लाभला. गुरुदेवांनी आमच्यावर कृपाच केली, हे आम्ही अनुभवत आहोत. त्याविषयी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. सोनी बळीराम गायकवाड, संभाजीनगर (२५.६.२०२०)
|