कोकणातील आपत्तीग्रस्तांना साहाय्यासाठी एक मासाचे वेतन देणार ! – राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार, भाजप

नगर, २८ जुलै – कोकणातील अतीवृष्टीग्रस्तांच्या साहाय्यासाठी स्वत:चे १ मासाचे वेतन देणार असल्याचे भाजपचे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. विखेंनी मतदारसंघात साहाय्य संकलित करण्यासही प्रारंभ केला आहे. पक्षाच्या आमदारांनी स्वत:चे वेतन साहाय्य म्हणून देण्याचा निर्णय शक्यतो पक्ष पातळीवर घेतला जातो; पण मी वैयक्तिक पातळीवर असा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. माणुसकीचा धर्म म्हणून मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावातून साहाय्य गोळा करून कोकणातील आपत्तीग्रस्तांना पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून साहाय्य पाठवण्याचे नियोजन गावपातळीवर करण्यात येत आहे.

विखे-पाटील पुढे म्हणाले की, राज्य सरकारने तात्काळ साहाय्य करणे अपेक्षित होते; पण तसे होतांना दिसून येत नाही. यापूर्वी राज्यात अनेक नैसर्गिक संकटे आली; पण राज्य सरकारचे कोणतेच साहाय्य आपतीग्रस्त किंवा शेतकर्‍यांना अद्याप मिळालेले नाही. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक‍र्‍यांना त्याचा लाभ झाला नाही. विमा आस्थापनांकडून शेतक‍र्‍यांची फसवणूक होत आहे. नैसर्गिक आपत्तीत सरकारने नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे.