अमेरिकेत पुन्हा सापडत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण !
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा मास्क घालावा लागणार !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये ६० सहस्रांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अमेरिका पुन्हा एकदा रुग्ण सापडण्याच्या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक धोका असणार्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमुळेही इतरांना संसर्ग होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
१. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या संचालकांनी मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. आकडेवारीनुसार लस अत्यंत प्रभावी असली, तरी कोरोनाच्या ‘डेल्टा’ विषाणू प्रकाराच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
२. अन्य देशांपेक्षा अधिक प्रमाणात लसींचा पुरवठा होत असतांनाही अमेरिकेत अनेक मासांपासून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले की, लसीकरणामध्ये आपण अजून चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे निर्णय घेतले जाणार आहेत.