‘परात्पर गुरु डॉक्टर तुळशीला पाणी घालत आहेत’, यासंबंधीचा भाववृद्धीसाठी प्रयोग करत असतांना सांगली येथील श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांनी अनुभवलेली भावावस्था !

‘दैनंदिन व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये भाववृद्धी होण्यासाठी छोटे छोटे प्रयोग करण्यास सांगितले जाते. एकदा ‘परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमातील तुळशीला प्रतिदिन पाणी घालत असतांना तुळशीच्या मुळाशी बसून ‘काय अनुभवण्यास आणि शिकायला मिळते’, हे पाहूया’, असा प्रयोग करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी सकाळी हा भावप्रयोग परात्पर गुरु डॉक्टरांनीच माझ्याकडून करवून घेतला. परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला अनुभवण्यास आणि शिकण्यास दिलेली सूत्रे कृतज्ञतापुष्प म्हणून मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पहिला दिवस

‘तुळशीच्या मुळाशी बसण्याची पात्रता नाही’, असे वाटणे; परंतु आज्ञापालन म्हणून तशी कृती करणे : पहिल्या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘माझी तुळशीच्या मुळाशी बसण्याची पात्रता नाही; मात्र मला तसे करण्याची आज्ञा केली आहे, तर आपण तशी कृती करूया.’

२. दुसरा दिवस

तुळशीच्या मुळाशी बसता न येणे आणि परात्पर गुरुदेवांनी लहान होण्यास सांगितल्यावर त्यांच्या संकल्पाने लहान होता येणे : दुसर्‍या दिवशी मी तुळशीच्या मुळाशी बसण्याचा प्रयत्न केला; परंतु मला बसता येईना. मी केवळ जवळ जाऊन उभा राहिलो. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर पाणी घालण्यास आल्यावर त्यांनी स्मितहास्य करून विचारले, ‘इथे का उभे आहात ?’ मी त्यांना ‘मला तुळशीच्या मुळाशी बसता येत नाही’, ही अडचण सांगितली. तेव्हा पुन्हा स्मितहास्य करून ते म्हणाले, ‘ एवढेच आहे, तर आपण लहान व्हायचे, म्हणजे मुळाशी जाता येईल.’ त्याप्रमाणे त्यांच्या संकल्पाने मी लहान होऊन मुळाशी जाऊन बसलो. नंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर घालत असलेल्या पाण्याचे तुषार माझ्या सर्वांगावर पडत आहेत आणि त्यामुळे माझे शरीर अन् मन शुद्ध होत चालले आहेत. माझे स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळांवर पाण्याने आघात होऊन स्वभावदोष अन् अहं न्यून होत चालले आहेत’, हा भाव दिवसभर टिकून होता.

३. तिसरा दिवस

परात्पर गुरुदेवांनी कृतीच्या स्तरावर प्रत्येक वेळी लहान होण्याचे महत्त्व सांगणे : तिसर्‍या दिवशी हा भावप्रयोग करतांना ‘आता आपल्याला गुरुदेवांनी शिकवले आहे, तर लहान होऊन आज लवकर मुळाशी जाऊन बसूया’, असा विचार मनात आला. त्याप्रमाणे मी ते येण्यापूर्वी मुळाशी जाऊन बसलो. परात्पर गुरु डॉक्टर पाणी घालायला आल्यावर माझ्याकडे बघून स्मितहास्य करत म्हणाले, ‘लहान होण्याने काय काय लाभ होतात, ते आता कळले का ? तुम्ही प्रक्रिया राबवत आहात, स्वयंसूचना देत आहात; पण तेवढ्याने भागणार नाही. कृतीच्या स्तरावर प्रत्येक वेळी लहान होता आले, तरच यांतून लवकर बाहेर पडता येईल. ‘मी’, ‘माझे’, ‘मला’, असे करत स्वतःला मोठे केले आहे. लहान मुलासारखे निर्मळ, निरागस आणि प्रांजळ व्हायला पाहिजे. तुम्ही लहान झाल्यामुळे तुळशीच्या मुळाशी आला आहात. या प्रक्रियेचा लाभ करून घ्या !’ मी एकदम भानावर आलो. आपोआप कृतज्ञतेने हात जोडले गेले. दिवसभर लहान होण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे काही विशेष प्रसंग घडले नाहीत.

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

४. चवथा दिवस

तुळशीच्या पानांमधून वातावरणात शुद्ध हवा, प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जा पसरत असल्याचे जाणवून प्रत्येक कृती आनंददायी होणे : चवथ्या दिवशी हा भावप्रयोग करतांना तुळशीच्या मुळाशी बसल्यावर ‘तुळशीच्या पानांमधून वातावरणात शुद्ध हवा, प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जा पसरत आहे. त्या सुगंधी अन् चैतन्यदायी वातावरणात माझी प्रत्येक कृती आनंददायी होत आहे’, अशी अनुभूती दिवसभर घेता आली.

५. पाचवा दिवस

अंगावर तुळशीची पाने पडल्यावर ‘हा देह गुरुदेवांचा आहे आणि तेच सर्व कृती करत आहेत’, अशी भावावस्था निर्माण होणे : पाचव्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर तुळशीला पाणी घालत असतांना तुळशीची ५ – ६ पाने माझ्या अंगावर पडली. परात्पर गुरु डॉक्टर स्मितहास्य करत म्हणाले, ‘लक्षात आले का ?’ त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले, ‘आपण नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवतो, म्हणजे ‘इदं न मम।’ म्हणजे ‘हा त्यागही माझा नाही.’ देहावर तुळशीपत्र पडले, म्हणजे ‘हा देह माझा नसून परात्पर गुरुदेवांचाच आहे.’ मी करत असलेली प्रत्येक कृती अन् सेवा परात्पर गुरु डॉक्टरच करत आहेत. त्यामुळे ‘प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ होत आहे’, या भावावस्थेत दिवसभर रहाता आले.

 ६. सहावा दिवस

‘परात्पर गुरुदेव प्रतिदिन आपल्या प्रिय तुळशीला पाणी घालत आहेत, त्याप्रमाणेच आपण प्राणप्रिय परात्पर गुरुदेवांना आनंद होईल, अशी साधना प्रतिदिन करायला हवी’, हा भाव निर्माण होणे : सहाव्या दिवशी तुळशीच्या मुळाशी बसल्यावर परात्पर गुरुदेवांनी सुचवले, ‘श्रीविष्णूला तुळस प्रिय आहे; म्हणूनच विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेव प्रतिदिन आपल्या प्रिय तुळशीला पाणी घालत आहेत.’ तुळशीप्रमाणेच विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांना सर्व साधक प्रिय आहेत. स्वतः अनेकविध त्रास सहन करून साधकांचे रक्षण करत आहेत. साधकांना त्रास झालेला त्यांना आवडत नाही. व्यवहारात आपण प्रिय व्यक्ती आनंदी रहाण्यासाठी सदोदित सावधानता बाळगतो. तसे प्राणप्रिय परात्पर गुरु डॉक्टरांना आनंद होईल, अशी त्यांना अपेक्षित सेवा आणि साधना, प्रामुख्याने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया प्रांजळपणे करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी सर्व प्रकारची उपलब्धता अन् कार्यप्रणाली दिलेली आहे. या भावावस्थेत दिवसभरातील सर्व साधना आणि सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न परात्पर गुरुदेवांनीच माझ्याकडून करवून घेतला. त्यामुळे परात्पर गुरुदेवांच्या इतकाच मलाही आनंद अनुभवता आला.

७. सातवा दिवस

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसून  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई यांनी केलेल्या पाद्यपूजेप्रमाणे ‘आपण साधना अन् प्रक्रियारूपी सुगंधी पुष्प अर्पण करून गुरुदेवांची पाद्यपूजा करूया’, असा भाव निर्माण होणे : सातव्या दिवशी तुळशीच्या मुळाशी बसल्यावर परात्पर गुरु डॉक्टर पाणी घालत असतांना मला तुळशीच्या पानांचा सुगंध, चैतन्य आणि तेज (प्रकाश) वातावरणात पसरल्याचे जाणवले. तुळशीमध्ये विष्णुतत्त्व प्रामुख्याने आहे. यासाठीच कोणत्याही पूजेच्या प्रसंगी स्वतःच्या अंगावर आणि देवतांवर पवित्र जल अन् पंचामृत यांचे प्रोक्षण तुळशीपत्राने केले जाते. तुळशीमधील विष्णुतत्त्वाचा लाभ व्हावा, यासाठीच हे नियोजन असावे. परात्पर गुरु डॉक्टरांमधील विष्णुतत्त्वाची अनुभूती अनेक संत आणि साधक घेत आहेत. शेषशायी पहुडलेल्या श्रीविष्णूची अनुभूती नाडीपट्टीवाचक संतांनी दिली आहे. श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसून पाद्यपूजा करत आहेत. आपणही सर्व साधक त्यांना आवडणारी सेवा, साधना आणि प्रक्रियारूपी सुगंधी पुष्प अर्पण करून त्यांची प्रतिदिन पाद्यपूजा करूया आणि विष्णुतत्त्वाचा लाभ करून घेऊया. हा भाव सदोदित जागृत ठेवण्यासाठी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना होऊ लागली.

८. आठवा दिवस

तुळशीच्या मुळातील माती अंगाला लागणे, ‘हे सर्वच व्याधींसाठी उपयुक्त आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे अन् ‘तुळशीप्रमाणे देवाने आपल्याला दिलेल्या गुणांचा लाभ सर्वांना होण्यासाठी प्रयत्न करायला हवा’, असा भाव निर्माण होणे : आठव्या दिवशी तुळशीच्या मुळाशी बसल्यावर तुळशीच्या मुळातील माती अंगाला लागली. हे पाहून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘छान झाले ! काही आजार किंवा व्याधी असल्यास अन् मानसिक शांतीसाठी हे चांगलेच आहे. तुळशीची पाने, मंजिरी, माती आदी सर्वच उपयोगी आहे. त्याचप्रमाणे तुळशीमुळे हवा शुद्ध होते; म्हणूनच घरासमोर तुळशी वृंदावन किंवा तुळस असेल, तर घरात सात्त्विक स्पंदने येऊन त्याचा लाभ होतो. तुळशीप्रमाणे देवाने आपल्याला दिलेले शरीर, मन आणि बुद्धी यांचा लाभ इतरांना कसा होईल ?’, हे पहायला हवे. तसे आपले वर्तन, कृती आणि आचरणही हवे. यासाठीच गुरुदेवांनी दिलेली प्रक्रियेची संजीवनी प्रांजळपणे राबवण्याचा सदोदित ध्यास असावा.

‘भाववृद्धी होण्यासाठी एका छोट्याशा प्रयोगातून प्रत्येक दिवशी अनुभवण्यास आलेला भाव आणि शिकण्यास मिळालेली सूत्रे त्या त्या दिवशी आढाव्याच्या रूपाने गुरुचरणी अर्पण करता आली. ‘माझा असा भाव सातत्याने टिकून राहूदे आणि या भावसागरात आम्हाला सतत रहाता येऊ दे’, अशी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः प्रार्थना आहे.’

– श्री. दत्तात्रेय कुलकर्णी, गावभाग, सांगली. (२३.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.