अधिवक्ता केसरकर यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
१. आपत्काळ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आधीची शुद्धी !
सध्याचा आपत्काळ हा केवळ आपत्काळ नसून धर्मसंस्थापनेचा काळ आहे. आपल्याला जरी हा आपत्काळ दिसत असला, तरी ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आधीची शुद्धी आहे. विविध आपत्तींच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीची शुद्धीच होत आहे आणि पुढे गुरुदेवांचे संकल्पित ‘हिंदु राष्ट्र’ प्रत्यक्ष अवतरणार आहे. जी आपत्कालीन स्थिती आज उद्भवली आहे, यावरून द्वापरयुगातील महाभारताच्या युद्धाची आठवण होते.
२. गुरुदेव हे श्रीविष्णूचा अवतार असल्याने साधकांनी ‘आपण प्रत्यक्ष धर्मसेवाच करत आहोत’, या भावाने प्रत्येक सेवा करणे आवश्यक !
द्वापरयुगात श्रीकृष्णाने पाच पांडवांसहित अर्जुनाच्या माध्यमातून धर्मकार्य करून घेतले. धर्माला विजय प्राप्त करून देऊन धर्माची संस्थापना केली. ही धर्मसंस्थापना करण्यासाठी साक्षात् श्रीकृष्ण परमात्मा अवतरला होता. त्याप्रमाणे या कलियुगामध्ये परात्पर गुरुदेव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात् ‘श्रीजयंतावतार’ अवतरला आहे. त्यांनी आपल्या प्रत्येकाला त्यांच्या या दिव्य अवतारी कार्यामध्ये सहभागी करून घेतले असून आपापल्या क्षमतेनुसार गुरुसेवेची संधी दिली आहे. ‘गुरुसेवा म्हणजे प्रत्यक्ष धर्मसेवाच आहे’, या भावाने आपण मिळालेली प्रत्येक सेवा करायला हवी.
३. ‘आपले गुरु हे भगवंतच आहेत’, ही जाणीव ठेवून प्रयत्न करूया !
द्वापरयुगात श्रीकृष्णाकडे कुणी भगवंत म्हणून पाहिले नाही; पण त्याच्या अवतार समाप्तीनंतर सर्वांना ते लक्षात आले. आता सप्तर्षी आपल्याला गुरूंमधील अवतारत्व जाणण्याची आणि अनुभवण्याची दृष्टी देत आहेत. गुरुदेवांचे प्रत्येक कार्य पाहिले, तर त्यामध्ये श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या अवतारी कार्याची झलक दिसून येते. त्यांचे अवतारी पैलू आपल्याला अनुभवायला मिळतात. ‘आपले गुरु हे भगवंतच आहेत’, ही जाणीव ठेवून प्रयत्न करूया.
४. गुरुकृपेचे कवच असल्यामुळे साधकांना धर्मकार्यात विजय मिळणे
गुरूंनी कायद्यासंबंधी सेवा करणार्या साधक अधिवक्त्यांना गुरुकार्यामध्ये सहभागी करून घेतले आहे. महाभारतात जसे श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाप्रमाणे पांडवांनी धर्मयुद्ध जिंकले आणि धर्माला न्याय मिळवून दिला, त्याप्रमाणे या कलियुगात जे धर्मयुद्ध चालू आहे, त्यामध्ये धर्माला न्याय मिळवून देण्यासाठीच गुरूंच्या प्रेरणेने ‘हिंदु विधिज्ञ परिषदे’ची स्थापना झाली आहे. मंदिर सरकारीकरण या धर्मावरील आघाताच्या माध्यमातून सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती चैतन्याच्या स्रोतावरच आघात करत आहेत. त्यासाठी आपण प्रविष्ट करत असलेल्या याचिका, त्या विरोधातील मोहिमा, आंदोलने यांना गुरुकृपेने यश मिळत आहे. घोर कलियुगात छोटेसे यशही मोठेच असते. समाजातील अनेक जण धर्मकार्य करत आहेत; पण त्यांना दिशा नाही. त्यामुळे लोक त्यांना त्रास देतात. साधकांभोवती मात्र गुरुकृपेचे कवच असल्यामुळे साधकांना धर्मकार्यात विजय मिळत आहे.
५. मनातील शंका-कुशंकांचा त्याग करून श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांच्या चरणी शरण जायला हवे !
महाभारताच्या वेळी ‘कुरुक्षेत्र’ ही युद्धभूमी बनली होती; पण आज संपूर्ण पृथ्वीच ‘कुरुक्षेत्र’ म्हणजे युद्धभूमी बनली आहे. अशा स्थितीमध्ये धर्मलढा लढण्यासाठी कार्यरत असलेले अधिवक्ते हे धर्माच्या बाजूने न्याय मिळण्यासाठी लढणारे ‘धर्मयोद्धे’च आहेत. धर्माच्या बाजूने लढणार्या अर्जुनाच्या रथाचे साक्षात् श्रीकृष्णाने सारथ्य केले. त्याला योग्य दिशा दाखवली. एवढेच नव्हे, तर जेव्हा अर्जुनाचे मन असंख्य विचारांनी ग्रासले होते, तेव्हा प्रत्यक्ष गीतोपदेश करून श्रीकृष्णाने त्याला धर्मयुद्धासाठी प्रवृत्त केले. स्वत:च्या विश्वरूप दर्शनाने त्याच्या सर्व शंका मिटवल्या. ‘तुला काहीच करायचे नाही, मी आधीच सर्व केले आहे’, असे सांगून केवळ कर्म करण्यास सांगितले. त्याप्रमाणे या घोर कलियुगामध्ये श्रीकृष्णस्वरूप गुरुदेव वेळोवेळी दिशादर्शन करून आपल्या मनातील सर्व भ्रम, शंका मिटवून आपल्याला पुढे घेऊन जात आहेत.
६. पांडवांप्रमाणे साधकांनी धर्मसेवेमध्ये स्वत:ला समर्पित करून घ्यावे !
केवळ अर्जुनाच्या रथाचाच नव्हे, तर संपूर्ण युद्धाचा लगामच साक्षात् श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात होता. त्याप्रमाणे आपण सर्वांनी लक्षात घेऊया की, या कलियुगातील आपत्काळाचा, या धर्मयुद्धाचा लगामच साक्षात् श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांच्या हातात आहे. आपण केवळ निमित्तमात्र आहोत, कर्ते करविते गुरुदेवच आहेत. गुरूंचे नाव घेतले की, त्यांचे तत्त्व कार्यरत होऊन ते सर्वांना मिळते. त्यामुळे चिंता न करता, मनातील शंका-कुशंकांचा त्याग करून अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांच्या चरणी शरण जायला हवे. या कलियुगामध्ये गुरूंच्या कृपेने चालू असलेल्या धर्मयुद्धाचे आपण साक्षीदार जीव आहोत. पांडवांप्रमाणे आपण या धर्मसेवेमध्ये स्वत:ला समर्पित करूया.
७. गुरुदेवांनी आपल्या जीवनाचा लगाम सतत हाती धरून आपला जीवनरथ चालवावा, यासाठी त्यांना शरण जाऊया !
भगवंताच्या हातातून आपल्या जीवनाचा लगाम सुटला, तर आपले जीवन सैरभैर होऊन जाईल. आपण दिशाहीन होऊन अधोगतीच्या दिशेने जाऊ. यामुळेच आपल्या जीवनावरील भगवंताचा लगाम सुटू द्यायचा नाही. भगवंताने म्हणजेच गुरुदेवांनी आपल्या जीवनाचा लगाम सतत हाती धरून आपला जीवनरथ चालवावा, यासाठी आपण अर्जुनाप्रमाणे सातत्याने श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांना शरण जाऊया.
८. पूर्णपणे समर्पित होऊन साधना होण्यासाठी उत्तरदायी साधकांकडून मनातील शंकांचे निरसन करून घेणे आवश्यक !
युद्ध चालू होण्यापूर्वी अर्जुनाने त्याच्या मनातील शंका श्रीकृष्णाला आत्मनिवेदनाच्या स्वरूपात सांगितल्या. धर्मयुद्ध जिंकण्यापूर्वी मनाचे युद्ध जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अर्जुनाप्रमाणे मनातील विचार, शंका या मनातच न ठेवता वेळोवेळी उत्तरदायी साधकांकडून त्यांचे निरसन करून घेऊया. मनात शंका आणि विचार ठेवून साधना अन् सेवा केली, तर आपल्याला पूर्णपणे समर्पित होऊन साधना करता येत नाही. साधनेचा पूर्ण लाभही होत नाही. त्या शंका आपण उत्तरदायी साधकांना विचारल्यास त्यांच्या माध्यमांतून ज्ञानदात्या श्रीकृष्णाचे तत्त्व म्हणजेच गुरुतत्त्व आपल्यासाठी कार्यरत होऊन आपल्याला दिशादर्शन मिळेल.
९. गुरुच सर्वकाही करणार असल्याने कर्तेपणा त्यागून त्यांच्या चरणी संपूर्ण समर्पित होऊया !
धर्मयुद्ध श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांच्याच हातात आहे. त्यामुळे सर्वकाही तेच करणार आहेत. आपल्या गुरूंच्या विशाल धर्मकार्यामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन कार्य करण्याइतपत आपले सामर्थ्य नाही. त्यामुळे आपला कर्तेपणा पूर्णपणे त्यागूया. ‘मोक्षगुरु सगळ्यांची प्रगती करून घेणारच आहेत’, अशी श्रद्धा जागृत ठेवूया. सामर्थ्यशाली गुरूंच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन समर्पित होऊया. मग ‘गुरुदेवच आपला भार कसा वाहतात ?’, ‘आपला जीवनरथ आणि साधनारथ कसा चालवतात ?’, ‘तो कठीणाहून कठीण भवसागरातून आणि आपत्काळातून कसा तारून नेतात ?’, याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला घेता येईल.
|