५५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पंढरपूर येथील बालसाधिका कु. देवांशी नीलेश सांगोलकर (वय ३ वर्षे) हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवांशी नीलेश सांगोलकर एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांची मुलगी कु. देवांशी नीलेश सांगोलकर हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. गर्भधारणेनंतर
१ अ. ‘गर्भधारणा झाल्यापासून पत्नीचा साधना आणि अध्यात्म यांकडे कल पहिल्यापेक्षा अधिक वाढला. ‘मुलगा व्हावा’, अशी तिला अपेक्षा होती. तिच्या गर्भात असलेल्या बाळाच्या चैतन्याचा परिणाम तिच्या तोंडवळ्यावरून स्पष्ट जाणवत होता.’
– श्री. नीलेश आप्पासाहेब सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक (कु. देवांशीचे वडील), पंढरपूर
१ आ. ‘गर्भधारणा झाल्यापासून माझ्या समष्टी सेवेत वाढ झाली आणि माझ्याकडून कुठेही न अडकता सेवेला प्राधान्य देण्याचा भाग आपोआप घडू लागला.
१ इ. गर्भधारणा झाल्यापासून मला एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह जाणवत होता. मला कुठेही नकारात्मकता किंवा कसलीही चिंता वाटत नव्हती. मला वेगळीच आध्यात्मिक ओढ निर्माण झाली होती. त्या वेळी मी समष्टी सेवेतसुद्धा आपोआप सहभागी होऊ लागले होते.’
– सौ. विद्या नीलेश सांगोलकर (कु. देवांशीची आई), पंढरपूर
२. जन्मानंतर
२ अ. बाळाच्या जन्मानंतर घरातील प्रलंबित असणार्या सर्व गोष्टी पूर्ण होणे : ‘बाळाचा जन्म झाल्यानंतर घरामध्ये रखडलेल्या बर्याच गोष्टी अचानकच सुरळीतपणे पार पडल्या, उदा. घराची संरक्षक भिंत पुन्हा नव्याने बांधण्यात आली. पाण्यासाठी बोअरवेल खोदली. अंगणात लाद्या बसवण्याचे काम पूर्ण झाले. या सर्व आणि अन्य कृती करण्याचे अनेक दिवसांपासून ठरवूनसुद्धा त्यांना आरंभ होत नव्हता; परंतु बाळाच्या म्हणजे देवांशीच्या जन्मानंतर सर्व कृती आणि महत्त्वाच्या गोष्टी सुरळीत पार पडल्याचे लक्षात आले.
३. जन्म ते दीड वर्ष
३ अ. सर्वांना तिची ओढ जाणवणे : कुटुंब आणि नातेवाईक यांना देवांशीचा लळा आहे. सर्वजण ‘देवांशी हे वेगळेच बालक आहे’, असे सांगतात. सर्वांना तिच्याविषयी ओढ वाटते.
३ आ. देवांशी लहान असतांना झोपेत आणि जागेपणीही हातांच्या वेगवेगळ्या मुद्रा करायची.
३ इ. देवाची ओढ : ती देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांना ‘बाप्पा’, असे संबोधते. ती श्रीकृष्णाचे चित्र आणि परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र यांची स्वतःहून पापी घेते. तिला देवघरात जाऊन देवाचा प्रसाद खाणे फार आवडते आणि ती तो कुणाच्याही नकळत जाऊन खाते.
४. दीड ते २ वर्षे
४ अ. नामजपाच्या वेळी भावावस्थेत देवीला आळवतांना देवांशीने तिच्या वडिलांच्या दोन्ही गालांवरून हात फिरवणे आणि तेव्हा तिच्या माध्यमातून देवीच ही कृती करत असल्याचे जाणवणे : मी नामजपाच्या वेळी भावावस्थेत देवीला आळवतांना ‘साक्षात् देवीच माझ्याजवळ आहे’, अशी माझी स्थिती असते. त्या वेळी देवांशी माझ्यासमोर अचानक येऊन माझ्या दोन्ही गालांवरून तिचे दोन्ही हात फिरवते. त्या वेळी ‘तिच्या माध्यमातून साक्षात् देवीच ही कृती करत आहे’, असे मला जाणवते.
४ आ. सजीव – निर्जिव वस्तूंशी बोलणे : देवांशी हवा, दारे, झाडे यांच्याशी बोलते. तिने बोबड्या स्वरात ‘मला गरम होत आहे. थंड हवा येऊ दे’, असे म्हणताच काही क्षणात थंड हवा येते. हवेने दार बंद होत असतांना ती दाराला ‘थांब’, असे म्हणते. तेव्हा दार आपोआप थांबते. तिने दाराला बंद होण्यास सांगितल्यास दार आपोआपच बंद होते. हे आम्ही बर्याच वेळा अनुभवले आहे.’
– श्री. नीलेश सांगोलकर
४ इ. सेवेला जातांना देवीला मनातून प्रार्थना केल्यावर देवांशीने आशीर्वाद दिल्याची कृती करणे त्यातून तिच्या माध्यमातून देवीचे दर्शन झाल्याचे अनुभवणे : ‘मी सेवेसाठी बाहेर जातांना देवांशीला मनातून ‘देवी, आशीर्वाद द्या’, असे सांगायचो. त्या वेळी देवांशी माझ्यासमोर उभी रहायची. तेव्हा तिच्या रूपात मला ‘साक्षात् देवीचे दर्शन झाले’, असे जाणवायचे. तीसुद्धा कुणी न सांगता माझ्या डोक्यावर हात ठेवून आणि पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद द्यायची. त्यामुळे सेवासुद्धा निर्विघ्नपणे पार पडत असल्याचे माझ्या लक्षात आले.
४ ई. पाठदुखीचा त्रास होतांना कुणीही न सांगता पाठ चेपून देणे आणि त्यामुळे वेदना अल्प होऊन त्यातून आनंद मिळणे : देवांशी साधारण दीड वर्षाची होती. मी विश्रांती घेत असतांना तिला कुणीही न सांगता ती मला पालथे झोपण्यास सांगायची आणि माझ्या पाठीवर उभी राहून माझी पाठ चेपायची. त्या वेळी वेदना होत असणार्या ठिकाणी तिच्या पायांचा स्पर्श व्हायचा आणि तिने पाठ दाबून दिल्यावर मला आनंद वाटायचा. तेव्हा ‘एवढ्या लहान वयात तिला हे कुणी सांगितले असेल ? तिला ही बुद्धी कशी झाली असेल ?’, या विचाराने माझे मन भारावून जायचे.
४ उ. समजूतदारपणा
१. घरामध्ये साधक, नातेवाईक आणि अन्य कुणी आल्यास ती त्यांच्याशी मोठ्या व्यक्तीप्रमाणे जाण असल्यासारखी वागायची.
२. मी बाहेर सेवेसाठी किंवा अन्य कामासाठी जात असतांना ती माझी चप्पल बाहेर आणून ठेवते. मी आसंदीवर किंवा सुखासनावर बसलेलो असतांना पायाखाली पायपोस आणून त्यावर ‘पाय ठेवा’, असे सांगते. मी झोपतांना मला नियमित स्वतःहून माझीच चादर आणून देते. हे सर्व ती कुणीही न सांगता नियमित करत आहे.’
– श्री. आप्पा आनंदा सांगोलकर (देवांशीचे आजोबा)
४ ऊ. स्वावलंबी असणे : ‘देवांशीला स्वतः जेवायला आवडते. एवढ्या लहान वयातसुद्धा तिला इतरांनी भरवण्यापेक्षा स्वतः खाण्यातला आनंद अधिक वाटतो.’
– सौ. शरयू आप्पा सांगोलकर (देवांशीची आजी)
४ ए. ‘देवांशी आणि तिची मोठी बहीण यांच्यात वेगळा आध्यात्मिक सलोखा अन् प्रेमभाव असल्याचे जाणवते.’
– सौ. विद्या नीलेश सांगोलकर
५. सद्गुरूंनी देवांशीविषयी काढलेले उद्गार !
५ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
‘माझ्या वडिलांनी ‘नीलेशला दुसरी मुलगी झाली’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘काका, अभिनंदन ! आपल्याला दुसरी साधिका मिळाली.’’
५ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
मी रामनाथी आश्रमात सेवेसाठी गेलो असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना देवांशीचे छायाचित्र दाखवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘दादा, देवांशी श्रेयसीच्या (मोठ्या मुलीच्या) पुढची (पुढच्या टप्प्यातील) आहे.’’
६. स्वभावदोष
हट्टीपणा, रागीटपणा, सहनशीलता नसणे; स्वतःला वाटले, तरच स्वतःच्या वस्तू इतरांना देणे आणि रागीटपणामुळे मोठ्याने रडणे, हे तिच्यात प्रबळ दोष जाणवतात.’
– श्री. नीलेश आप्पासाहेब सांगोलकर (वडील), पंढरपूर (२१.७.२०२०)
|