दरड आणि पूर यांमुळे राज्यात ६ सहस्र कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !
अर्थसाहाय्य देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील !
मुंबई – महापूर, तसेच दरड कोसळणे यांमुळे राज्यातील ८ जिल्ह्यांत ६ सहस्र कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला अन् अमरावती या जिल्ह्यांत पुष्कळ हानी झाली आहे. त्यामुळे पिकांची हानीभरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन करणे, तसेच लोकांना साहाय्य करणे आदींसाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरस्थिती अन् हानी यांविषयी माहिती दिली. पुरामुळे राज्याची झालेली हानी आणि पूरग्रस्तांना द्यावयाचे साहाय्य यांवरही चर्चा केली.