रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाचे संकट !
पुण्यासह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ !
मुंबई – रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे पुराच्या फटक्यातून सावरत असतांनाच या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ची चेतावणी दिली आहे. ३० जुलै या दिवशी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून तेथे ‘ऑरेंज अलर्ट’ लागू करण्यात आला आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतीवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली; मात्र गेल्या २ दिवसांपासून पाऊस न पडल्याने पुराचे पाणी ओसरत असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. हवामान विभागाने २७ आणि २८ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस, तर २९ आणि ३० जुलै या दिवशी अतीवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे.